कल्याण :- पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या कडून स्मारक तोडण्याच्या कारवाई विरोधात एका ८५ वर्षाची आजी लक्ष्मीबाई मारुती ससाणे यांनी उद्यान वाचण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. १९ नोव्हेंबर २०२१ पासून उद्यानातच आमरण उपोषणासाठी त्या बसल्या आहेत.
कल्याण डोंबिवली महापालिकेने विकासाच्या नावाने व्यापाऱ्यांचा फायदा आणि बहुजन अस्मिता असणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा काही भाग घेण्याचा घाट घातला असल्याचे आंबेडकर अनुयायी म्हणत आहेत. एका बाजूला स्मार्ट सिटी साठी प्रस्तावित जागा असतांना काही हॉटेल मालकांना इमारती बांधण्याच्या परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे आंबेडकर वादी आणि आंबेकरांना मानणारा वर्ग आणि समाज पालिकेच्या निर्णयाच्या विरोधात उभा ठाकला आहे.
उद्यानाची जागा आजपर्यंत दोन वेळा तोडण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत पुन्हा उद्यानाची जागा घेऊ पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचवण्यासाठी या ८५ वर्षाच्या आजीच्यामागे आपण खंबीरपणे उभे राहून समर्थन देण्यासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना पाठींबा देताना समोर येत आहेत.
आयुक्त बंगल्याची भिंत बाधित होत असल्याने डीपी रस्ता थोडा नागमोडी करण्यात आला. काही वेगळा पर्याय करवून विकास पण झाला पाहिजे आणि उद्यान ही बाधित झाले नाही पाहिजे अशी काही पर्यायी व्यवस्था पालिकेने करण्याची वेळ आली आहे. अन्यथा उद्यानाचे प्रकरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत बीएम सी ऍक्ट कलम ४८७ नुसार हजारो हरकती घेण्यात आल्या आहेत.
-रोशन उबाळे