कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण डोंबिवलीत भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हादरे

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकिय उलथापालथ मागील वर्षभरापासूनच होताना दिसू लागली आहे. डोंबिवलीतुन भाजपाचे तीन माजी नगरसेवकांनी आता शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे. महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे अशी त्या तिघांची नावे असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कल्याण डोंबिवली या दोन मोठ्या शहरांची मिळून महानगरपालिका तयार होते. यातील कल्याण शहर म्हणजे शिवसेना तर डोंबिवली हा भाजपचा गड मानला जातो. २०१५ साली झालेल्या निवडणुकित शिवसेनेचे ५२ तर भाजपचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगली होती. यानंतर २०२० साली कार्यकाळ उलटून गेल्याने सर्व नगरसेवक आता माजी झाले असून महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे.

नव्या वर्षात २०२२ मध्ये कल्याण डोंबिवली सह राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुका रंगणार आहेत. २०१९ मध्ये राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-कोंग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडी सुरू झाली. राज्यातील बदलले समीकरण पाहता महानगरपालिका निवडणुकांवर देखील त्याचे परिणाम दिसणार याचा अंदाज आता नगरसेवकांना लागलेला आहे. म्हणूनच आता राजकीय उलथापालथ होताना दिसत आहेत.

साल २०१५ ते २०२० च्या काळात भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील हे प्र.क्र. ८२, अंबिका नगर चे नगरसेवक होते. तर अनुक्रमे सायली विचारे या प्र.क्र. ८३, गोग्रासवाडीच्या नगरसेविका होत्या. तर सुनीता पाटील यांनी प्र.क्र. १११ सागाव सोनारपाडाचे नगरसेवक पद भूषवले आहे. डोंबिवलीतील भाजपचे हे तिन्ही नगरसेवक आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. आम्ही कुठे तरी कमी पडलो. नगरसेवक का जात आहेत याचे कारण त्यांचे त्यांनाच माहीत असल्याची खंत डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तर मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

-संतोष दिवाडकर

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *