कल्याण :- कल्याण डोंबिवली व आसपासच्या शहरात तसेच महाराष्ट्रातील काही भागात सकाळपासून पावसाने रिपरिप सुरू केली आहे. जवळपास ८ तासांपेक्षा जास्त काळापासून पाऊस नॉन स्टॉप पडत आहे. यामुळे नक्की डिसेंबर आहे की जून असा संभ्रम निर्माण झाला आहे.
जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम मानला जातो. पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महिना हिट देतो आणि नोव्हेंबर पासूनच थंडीला सुरुवात होते. मात्र वाढलेल्या जागतिक तापमानानुसार डिसेंबर मध्येही फारशी थंडी जाणवत नाही. ज्याठिकाणी झाडी झुडूप असतील तितक्याच भागात थंडी जाणवते. कल्याण डोंबिवली सारख्या गर्दीच्या शहरी भागात थंडी फक्त सकाळच्या सुमारासच जाणवते. परंतु याच थंडीच्या दिवसांत पावसाळ्यात पडतो अगदी तसा पाऊस दिवसभर पडताना दिसत आहे.
कल्याण डोंबिवली शहरात सकाळपासून पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. स्वेटर काढून रेनकोट घालण्याची पाळीच अक्षरशः आलेली आहे. त्यात पालिका क्षेत्रात काही शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना देखील जून महिन्याचा आभास झाला. यामुळे समाज माध्यमांवर प्रचंड मिम्स आणि विनोद पसरत आहेत. हिवाळ्या नंतर डायरेक्ट पावसाळा सुरू झाला आहे मग उन्हाळा गेला कुठं ? अश्या पद्धतीचे विनोद सध्या वाचायला मिळत आहेत. तर काहींनी पुन्हा एकदा पावसाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर फिरण्याचा बेत आखला. तर काहींनी घरच्या घरी गरमागरम भजी बनवण्याला पसंदी दिली. त्यामुळे वेळी असो की अवकाळी पाऊस पाऊस आहे.
-संतोष दिवाडकर