कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दुसरी लाट ओसरल्यानंतर दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव देखील कमी होत असल्याचे दिसत आहे. सध्या महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झाले असून एक्टिव्ह रुग्णसंख्या देखील लोकसंख्येच्या तुलनेत जेमतेम राहिलेली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महानगरपालिका क्षेत्रात एकाच दिवसाला २४०० हुन अधिक रुग्णांची नोंद केली गेली होती. एक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढल्याने हॉस्पिटलमध्ये बेड मिळणे कठीण होऊन बसले. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, इंजेक्शन मिळवण्यासाठी लोकांना खूप कसरत करावी लागली. अशा परिस्थितीत दिवसाला २० पेक्षा जास्त लोकांना प्राण गमवावे लागत होते. म्हणून महानगरपालिका क्षेत्रात कडक निर्बंध लागू केले गेले. नागरिक आणि व्यापारी दुसऱ्या लॉकडाऊनला सामोरे गेले. मात्र आता लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पुढे पालिका आयुक्तांनी एकेकाळी गच्च भरलेले टाटा आमंत्रा रुग्णालयाला देखील टाळा लावला.

कल्याण डोंबिवली आता लवकरच कोरोना मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे समोर येणाऱ्या आकड्यांवरून वाटत आहे. आज दि.१७ ऑगस्ट रोजी महानगरपालिका क्षेत्रात ३२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. तर या बरोबर एकाचा मृत्यू देखील नोंदवला गेला आहे. मात्र सुखद बाब म्हणजे महानगरपालिका क्षेत्रात आता फक्त ४७४ इतकेच पोजीटिव्ह कोरोना रुग्ण आहेत. पुढे हा आकडा आणखी कमी होत कल्याण डोंबिवली कोरोना मुक्त होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. हत्ती निघून गेलाय फक्त शेपूट राहिलंय असे म्हणायला हरकत नाही.
-संतोष दिवाडकर