छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्त कल्याण येथील कला शिक्षक सुधाकर भामरे यांनी अवघ्या दीड तासात शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यपर्यंतच्या प्रसंगांची ३२ रेखाटनांआधारे शिवचरित्र रेखाटण्याचा विक्रम केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधून शिवाजी महाराजांचे चित्र देखील रेखाटले आहे. या सर्वांची नोंद नॅशनल ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.
भामरे यांना ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डचे पदाधिकारी यांच्या कडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. भामरे यांचे रेखाटन सुरू असतांना त्यांचे चित्रकार मित्र आनंद मेहेर यांनी शिवचरित्र या विषयावर व्याख्यान दिले. विविध कलागुण असलेले सुधाकर भामरे हे २१ वर्षांपासून एल. के. हायस्कुल, चुनाभट्टी या शाळेत कलाशिक्षक म्हणून आपली सेवा बजावत आहेत. कलेवर नित्तान्त श्रद्धा असेल भामरे हे सुरवातीला थर्मोकोल पासून मूर्ती बनविण्याचे काम करत होते. त्यातही त्यांनी उंच उंच अशा साई बाबा, स्वामी विवेकानंद, गणपती बाप्पाची विविध रूपे अशा अनेक मूर्ती त्यांनी साकारल्या आहेत. विविध गणपती सजावटी ही त्यांनी केलेल्या आहेत.
व्यक्तिचित्रण (पोट्रेट) मध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. त्यांनी आता पर्यंत अनेक महत्वाच्या व्यक्तींचे पोट्रेट बनवलेले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, जागतिक कीर्तीचे वकील उज्ज्वल निकम, कल्याणचे नगरसेवक रवी पाटील, समाजसेवक विकास पाटील आशा अनेक व्यक्तींचे पोट्रेट त्यांनी बनून त्यांना प्रत्यक्ष भेट म्हणून ही दिली आहेत.
सर्वसाधारण कुटुंबातून आपल्या अंगभूत कलागुणांच्या ताकदीने ते इथपर्यंत पोहचू शकले आहेत. कलेची कास असलेला हाडाचा, सहृदयी कलाशिक्षक त्यांच्यात पाहावयास मिळतो. त्याचे उदाहरण म्हणजे शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत कलेचे शिक्षण दिले आहे. त्या सर्व विद्यार्थांनी उत्तम कामगिरी करत कला विषयांच्या विविध परीक्षांमध्ये घवघवीत यश ही संपादन केले आहे. त्यांची ही उत्तम कलोपासना पाहून तत्कालीन मुखमंत्री विलासराव देशमुख, तत्कालीन शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री वसंत पुरके यांनी अभिनदांचे पत्र देऊन त्यांच्या कलासेवेचे कौतुक करत इतर शिक्षकांसाठी प्रेरणादायी कार्य असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रकल्पामध्ये मित्र आनंद मेहेर यांनी मोलाची साथ दिली.
-कुणाल म्हात्रे