कल्याण : महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला २६० फूट उंच आणि ९० अंश कोनात असलेला “वजीर” सुळका कल्याण शहरातील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहक संघाने खडतर प्रयत्नांनंतर सर केला आहे.
कल्याण मधील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने या “वजीर” सुळका पार करण्याच्या मोहिमेचे आयोजन केले होते. यात पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जामधरे, देविदास गायकवाड, महेश पाडवी हे सहभागी झाले. हे सर्व तरुण कल्याण शहरातील रहिवासी आहेत. या सर्व तरुणांनी सर्वात प्रथम सुळक्याच्या पायथ्याला शिवमूर्तीचे आणि सुळक्याचे हार नारळाने पूजन करून मोहिमेची सुरुवात केली. आणि नंतर १ तासात दोरखंडाच्या सहाय्याने वर चढले. वजीर सुळका सर करतांना हा ५ स्थानकात भागला जातो, त्यात तब्बल १०० फुटांचा ओव्हरहँग झूमरिंग करून पार करावा लागतो. हा सुळखा शहापूर तालुक्यातील वशिंद स्थानकापासून जवळ आहे.
याबाबत भूषण पवार यांनी सांगितले की हा सुळका सर करायला गिर्यारोहणाचे अत्याधुनिक साहित्य वापरूनचं सर करणे शक्य होते. ज्यात रोप म्हणजेच दोरखंड आवश्यक आहे. सुळक्यावर ठराविक ठिकाणी हा दोरखंड लावायला बोलटिंग म्हणजे खिळे ठोकले आहेत. त्यात आपण ही रोप लावून सर करता येतो. दोरखंड आणि बोलटिंग ह्यांना क्यूडी ह्या साहित्याने आपण बांधून ठेवतो. एकदा का आपण टॉपला गेलो की इतर सदस्य हे बोलटिंग आणि रोपला झुमर हे साहित्य अडकवून शरीराची ताकत लावून वर सरकतात.एकदा का वर पोहचलो की राप्पेल्लिंग करून म्हणजे दोरीच्या मदतीने आपण सुळक्याच्या पायथ्याशी येतो असे भूषण पवार यांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे