डोंबिवली वरून पेंढारकर कॉलेज, ऊस्मा पेट्रोल पंप मार्गे कल्याण शीळ रोडकडे जाणारा मार्ग हा कल्याण शीळ रोड लगत एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईन खोदाईमुळे गेल्या दहा दिवसांपासून वाहतूक आणि लोकांचा रहदारीसाठी बंद असल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.
या कामामुळे येथून जाणारी येणारी सार्वजनिक बस वाहतूक, लोकांचा जाण्या येण्याचा मार्ग बंद झाल्याने त्या सर्वांना मोठा वळसा घालुन जावे लागत आहे. हे काम पावसाळ्यात करायचे होते तर लवकर पूर्ण करणे गरजेचे होते. कारण हा मार्ग वाहतुकीचा दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य जनतेसाठी लोकल ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन याचे नियोजन करणे गरजेचे होते.
जर अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर येथे दरवर्षी पावसाळी पाणी तुंबण्याचे प्रकार होत असल्याने त्याचा फटका अधिक तीव्रतेने येथे होईल. हे काम व्यवस्थित आखणी करून केले असते तर ते चार दिवसात पुरे करता आले असते. आतातरी हे काम लोकांसाठी एमआयडीसीने तातडीने लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सामजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी दिली आहे.
-कुणाल म्हात्रे