कल्याण शहरातील ९७ वर्षीय पंजोबानी कोरोना सोबत पंजा लढवून कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून ठणठणीत बरे होवून त्यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच नकारात्मक परिस्थिती असताना कल्याण शहरातील ९७ वर्षांच्या पंजोबांनी मात्र कोरोना वर यशस्वी मात करत एक सकारात्मक संदेश दिला आहे. रामचंद्र नारायण साळुंखे असे या या पंजोबांचे नाव असून आपल्याला कोरोनाशी न घाबरता त्याच्याशी लढून त्याला हरवायच आहे असा संदेश त्यांनी दिला आहे.
गेल्या महिन्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज वाढणारे रेकॉर्डब्रेक रुग्ण आणि फुल होणारे बेड तसेच ऑक्सिजन व इंजेक्शनचा तुटवडा पाहता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. परंतु नकारात्मक परिस्थितही कल्याण मधील ९७ वर्षीय रामचंद्र नारायण साळुंखे या पंजोबानी कोरोनाला थेट धोबीपछाड दिला आहे. त्यांच्यावर कल्याण पश्चिम लाल चौकी येथील महानगरपालिकेच्या आर्टगॅलरी कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले आणि त्यांनी देखील त्या उपचाराला खंबीरपणे साथ देत कोरोना वर मात केली आणि आज ते आपल्या घरी सुखरूप परतले आहेत.