कल्याण :- सध्या महाराष्ट्रभरात चर्चेचा विषय बनलेले कालीचरण महाराजांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. १० डिसेंबर राजी कल्याण शहरात येऊन वादग्रस्त वक्तव्य केल्याबाबत राष्ट्रवादी कोंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
श्री शिवप्रताप फाउंडेशनच्या वतीने १० डिसेंबर रोजी कल्याण पूर्वेत शिव प्रताप दिन साजरा करण्यात आला होता. या निमित्ताने कालीचरण महाराज उपस्थित राहिले होते. उपस्थित समुदायाला संबोधित करताना त्यांनी मंचावर भाषण केले होते. या भाषणातून त्यांनी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या थोर पुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्याचप्रमाणे दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सांगितले.
एसटीपीआय पार्टीचे फरदीन पैकर आणि राष्ट्रवादीचे नोवेल साळवे, मनोज नायर, पत्रकार बाळकृष्ण मोरे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. याबाबत सोमवारी कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यात येऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही पत्र पाठविण्यात आले आहे. यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. त्यामुळे यानिमित्ताने कालीचरण महाराज पुन्हा कल्याण मध्ये येणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
-संतोष दिवाडकर