कल्याण : सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केल्या नुसार “युवा स्वास्थ कोविड-१९ च्या लसीकरण मोहिमेचे नियोजन” कल्याण डोंबिवली महानगरपालिके मार्फतही करण्यात येत असून आता महापालिका क्षेत्रातील १८ वर्षावरील महाविदयालयीन विदयार्थी/ विदयार्थींनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच लसीकरण आता प्रत्यक्ष महाविदयालयात जावून केले जाणार आहे. यासाठी महापालिका क्षेत्रातील महाविदयालयातून तेथील विदयार्थी व इतर कर्मचारी वर्गाची यादी प्राप्त करुन त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत त्यांचे लसीकरण २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत केले जाणार आहे.
महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकुण ८ लाख ९८ हजार ९० नागरिकांनी कोविड लसीची पहिली मात्रा घेतली असून एकुण ४ लाख ४९ हजार ४६ नागरिकांनी लसीची दुसरी मात्रा घेतली असून आतापर्यंत १३ लाख ४७ हजार १३६ इतके लसीकरण महापालिका क्षेत्रात झाले आहे. लसीकरणास अधिकाधिक चालना देण्यासाठी भारतातील शंभर कोटी लसीकरण टप्पा पूर्णत्वाचे औचित्य साधून महापालिकेच्या महानगरपालिकेच्या विविध नागरी आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी आलेल्या शंभराव्या लाभार्थ्याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला आणि सर्व नागरी आरोग्य केंद्रावर १०० करोड लसीकरण उत्सवाचा टप्पा संपन्न करण्यात आला.
कोविड लसीकरण हे पूर्णपणे सुरक्षित असून त्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही. तसेच लसीकरण केल्याने संबंधीत व्यक्तीस संसर्गाचा धोका कमी असतो आणि त्यास कोविड झाल्यास त्याचा प्रादुर्भावही कमी प्रमाणात राहतो. तसेच कोविड लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होते. महापालिकेत आता मुबलक प्रमाणात लस साठा शासनाकडून उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद दिल्यास महापालिका क्षेत्रातील कोविडचा संसर्ग कमी होण्यास तसेच येणा-या तिस-या लाटेला थोपविण्यास मदत होऊ शकेल.
तरी महापालिका क्षेत्रातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरा नजिकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले कोविड लसीकरण करावे असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी केले आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात किंवा घराशेजारी आजारी, वृध्द नागरिक कोविड लसीकरणापासून वंचित राहिले असल्यास त्याची माहिती नजीकच्या नागरी आरोग्य केंद्राकडे कळवावी म्हणजेच या नागरिकांच्या घरी जावून त्यांचे लसीकरण महापालिकेच्या आरोग्य पथकामार्फत केले जाईल.
-कुणाल म्हात्रे