कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका तरुणीला व तिच्या दोन मित्रांना मारहाण झाली होती. एक रिक्षाचालक आणि त्याने जमवलेल्या तरुणांनी या तिघांना मारहाण केली होती. यासंदर्भात गुन्हा का दाखल झाला नाही ? असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोळसेवाडी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.
काल रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षाने प्रवास करीत होती. याच रिक्षाच्या चालकाने तिची छेड काढली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे दोन्ही मित्र रिक्षाचालकाला जाब विचारण्यासाठी आले होते. मात्र असे असताना रिक्षाचालकाच्या संबंधित जमावाने राहुल गडेकर आणि बंटी प्रधान या दोघांना मारहाण केली. त्यांच्या समवेत त्या तरुणीला देखील अमानुष मारहाण करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक इसम पट्ट्याने मारहाण करताना देखील दिसत आहे.
तरुणीला मारहाण केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. मात्र तरीही दुपार पर्यंत मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाणे पोलीस आणि कोळसेवाडी पोलीस स्थानक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. झालेली घटना निंदनीय असून पोलीस कशाची वाट पाहत आहेत असा सूर उमटवला गेला आहे.
“कल्याण कोळसेवाडीतील संतापजनक घटना व त्यावर ठाणे शहर पोलिसांची अजब कार्यपद्धती. बचावाला येणार्यांनाचं पोलिसांनी पोलिस स्टेशनला बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत. अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक पुढे धजावतील का ? नियम कायदे ढिगाने बनवलेत हो. पण त्याची अंमलबजावणी कधी होणार ??”
– चित्रा वाघ (भाजप प्रदेश उपाध्यक्षा)
-संतोष दिवाडकर