कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी १० मार्च रोजी निर्बंध लादले होते. मात्र या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान होत असल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्या कानावर आल्या. यातून व्यापार्यांना काहीसा दिलासा देण्यासाठी त्यांनी निर्बंधात नवे बदल केले आहेत.
कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचा दिवसाचा आकडा १०० च्या आत येत असताना अचानकच तो ४०० पर्यंत जायला लागल्याने आयुक्तांनी कडक निर्बंध लादले होते. यानुसार दुकाने सायंकाळी ७ ते सकाळी ७ या वेळात बंद ठेवण्यास संगीतले होते. परंतु यामुळे व्यापारी वर्गात संतापाची आणि चिंतेची लाट उसळली. दुकानभाडे,घरखर्च अशा सर्व चिंता त्यांना लागून होत्या. हि बाब लक्षात घेत आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी १५ एप्रिल रोजी निर्बंधात बदल करून व्यापार्यांना काहीसा दिलासा दिला आहे.
सकाळी १० नंतर व्यापार्यांना दुकान उघडायची वेळ निश्चित करून दिली आहे. पूर्वीची वेळ सकाळी ७ होती. ज्याचा कोणताही फायदा व्यापारी वर्गाला होत नव्हता. नव्या बदलानुसार व्यापारी आता सायंकाळी ८ वाजेपर्यंत आपले दुकान उघडे ठेऊ शकतात. वेळेच्या निर्बंधातून जीवनावश्यक सेवा देणारी दुकाने जसे कि भाजीपाला,फळे,किराणा,दुध आदी वगळण्यात आली आहेत. तर बाकी निर्बंध तसेच कायम ठेवण्यात आलेले आहेत.
क.डों,म.पा. क्षेत्रातील निर्बंध
- सकाळी १० ते सायंकाळी ८ पर्यंत दुकाने चालू (जीवनावश्यक सेवांची दुकाने )
- खाद्यपदार्थ व खाद्यपेय हातगाड्या तसेच फेरीवाल्यांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत परवानगी.
- शनिवार-रविवार P1-P2 नुसार दुकाने चालू (पालिका व पोलिसांचे नियोजन).
- आठवडे बाजार बंद.
- खाद्यगृह, रेस्टॉरंट आणि बार, ज्यूस व आईस्क्रीम पार्लर, परमिट रूम, पार्सल सेवा सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत ५०% क्षमतेने सुरु.
- जीवनावश्यक सेवा देणाऱ्या व्यापार्यांनी गर्दी होऊ न देणे, कोरोना पासून बचावाची साधने वापरणे तसेच स्वच्छता राखणे अनिवार्य असेल.
- रिक्षातून प्रवास करताना फक्त दोनच प्रवासी बसवण्याची मुभा.
- सामाजिक,राजकीय,धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाही.
- लग्न समारंभ व इतर कार्यक्रम कोरोना नियमांना अनुसरून व्हावेत. याबाबतीत आयोजकांनी प्रभागक्षेत्र कार्यालय व पोलीस स्थानकात प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य. समारंभाचे चित्रीकरण करण करून ते स्वतः जवळ ठेवणे. तसेच पालिका प्रशासन व पोलीस स्टेशनला प्रत उपलब्ध करून देणे आवश्यक राहील.
- जिम,स्पोर्ट्स क्लब,खेळाची मैदाने,उद्याने,स्विमिंग पूल फक्त वैयक्तिक सरावासाठी खुले. स्पर्धा आणि इतर कार्यक्रमास परवानगी नाही.
अशा प्रकारचे निर्बंध सध्या महानगरपालिका क्षेत्रात लागू करण्यात आले असून उल्लंघन करणार्यावर कारवाई करण्यात येईल. १५ मार्च रोजी महानगरपालिका क्षेत्रात एकूण २३६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तिघे जन कोरोनाने दगावले आहेत. सध्या महापालिका क्षेत्रात एकूण ३०६८ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत असून कोरोनावर नियंत्रण येई पर्यंत हे निर्बंध सुरु असणार आहेत.