क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या कडक निर्बंध लागू असतानाही कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा पुन्हा उसळी घेत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. या आठवड्यात रविवार दि.१८ एप्रिल ते शनविवर दि.२४ एप्रिल पर्यंत ५८ रुग्ण कोरोनाने दगावल्याची नोंद झाली असून ही चिंतेची बाब बनली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी राज्यसरकारने ३० एप्रिल पर्यंत महाराष्ट्रभर कडक निर्बंध लागू केले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात देखील आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी विशेष काळजी घेत आहेत. सध्या सर्वत्र ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, इंजेक्शन आणि आता तर लसींचाही तुटवडा भासू लागलेला आहे. अशातच क.डों.म.पा. क्षेत्रात मृत्यू दर देखील हळूहळू वाढू लागला आहे. कोरोना आजार बरा होण्याचे प्रमाण जास्त असले तरी नागरिकांनी लक्षण जाणवताच फार वेळ न घालवता चाचणी करून उपचार सुरू करावे असे आवाहन आता काही डॉक्टर देखील करीत आहेत.
साधारण वर्षभरापासून महानगरपालिका क्षेत्रात दिवसाला ५ पेक्षा कमी रुग्ण दगावत होते. काही दिवशी एखादा रुग्ण तर काही दिवशी पाच. तर असेही काही दिवस होते ज्यादिवशी एकही रुग्ण दगावला नसेल. मात्र आता दिवसाला १० पेक्षा अधिक रुग्ण दगवण्याचे चित्र दिसू लागले आहे.
आठवड्याभरात दगावलेले रुग्ण :-
दि.१८ रविवार – ५ रुग्ण
दि.१९ सोमवार – ७ रुग्ण
दि.२० मंगळवार – ६ रुग्ण
दि.२१ बुधवार – ८ रुग्ण
दि.२२ गुरुवार – ९ रुग्ण
दि.२३ शुक्रवार – १२ रुग्ण
दि.२४ शनिवार – ११ रुग्ण
क.डों.म.पा. क्षेत्रात याच आठवड्यात जितक्या लोकांना कोरोनाची लागण झाली तितकेच प्रमाण बरे होणाऱ्या रुग्णांचे देखील आहे ही बाब दिलासादायक आहे. मात्र त्यासाठी नागरिकांनी स्वतःची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.