महाराष्ट्रभरात लोकडाऊन १५ जून पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. क.डों.म.पा. क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काही अंशी शिथिलता देण्यात आली असून मॉल आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिली असून सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने सुरु राहणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमालीची घटलेल्या कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गासाठी केडीएमसीने मोठा निर्णय घेतला आहे. मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता इतर दुकाने सुरू ठेवण्यास केडीएमसीने परवानगी दिली आहे. आठवड्यातून केवळ ५ दिवस सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत ही दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवारी मात्र अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णयही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोवीड रुग्णसंख्या कमी असणाऱ्या शहरांबाबत अनलॉकचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले होते. तसेच ज्याठिकाणी कोवीड रुग्णसंख्या १० टक्क्यांपेक्षा कमी असेल तिकडे कोवीड निर्बंधांमध्ये सूट देण्याचे संकेतही दिले होते. त्यानूसार आता केडीएमसी आयुक्तांनी हे नविन निर्बंध लागू केले आहेत. १ जुन सकाळी ७ वाजल्यापासून लागू होणार हे निर्बंध १५ जूनच्या सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
यामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. अत्यावश्यक वस्तू वितरणासोबत अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचे वितरण ई कॉमर्स (ऑनलाइन पध्दतीने) करता येईल. दुपारी ३ नंतर वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगाव्यतिरिक्त येण्या-जाण्यावर निर्बंध असणार. कोरोना विषयक कामे करणाऱ्या कार्यालयाव्यतिरिक्त इतर शासकीय कार्यालये २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. यापेक्षा अधिक उपस्थितीसाठी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मंजुरी देईल.
कृषी विषयक दुकाने आठवड्याचे सर्व दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यँत सुरू राहतील. दुपारी २ नंतर दुकाने आणि कार्यालयात माल वाहतुकीद्वारे वितरण करण्यासाठी मुभा राहील. त्यामुळे २ नंतर कोणत्याही दुकानात किंवा कार्यालयात ग्राहकांना थेट काउंटर विक्री करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारे दुकान-कार्यालयावर दंडात्मक कारवाई केली जाईल. अत्यावश्यक नसलेली केवळ इतर एकल दुकाने (मॉल्स आणि शॉपिंग सेंटर वगळता) सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.अत्यावश्यक नसणारी सर्व दुकाने शनिवार आणि रविवार बंद राहणार असून यापूर्वी लागू केलेले इतर सर्व निर्बंध तसेच लागू राहतील असे आदेश केडीएमसी प्रशासनाने काढले आहेत.
- कुणाल म्हात्रे