कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रसुतीगृह रुग्णालयासमोर एका गरोदर महिलेला तासनतास बसून ठेवल्याचा केविलवाणा प्रकार समोर आला आहे. यंत्रणेचे कारण देत या महिलेस इतर ठिकाणी जाण्याचे सांगितल्याने आरोग्य सुविधांचा वानवा आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे वायले नगर येथे प्रसूतिगृह आहे. या प्रसूती गृहामध्ये दूध नाका परिसरामध्ये राहणारी इरफाना शेख या महिलेला प्रसूतीसाठी आणले असता तिची प्रसूती न करताच तिला रुग्णालयाच्या बाहेरच बसून ठेवण्यात आले होते. तुमचा शुगर वाढलेला आहे आमच्याकडे डॉक्टर नाहीत, आय सी यु नाही असे थातुरमातुर कारण सांगून या गरोदर महिलेला ठाणे मुंबईला जाण्याचा अजब सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान कोरोना काळात आधीच मेटाकुटीला आलेल्या नागरिकांना आता आरोग्य सेवा घेताना कुचंबणा केली जात आहे. त्यामुळे महिला आरोग्य विभागात गंभीर कुचंबणा करणाऱ्या डॉक्टरांवर आणि संबंधितांवर कारवाई होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-रोशन उबाळे
