कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येवू घातलेल्या निवडणुकीत मतदारांना जागृत करण्या साठी लावण्यात आलेल्या कंदीलच्या प्रतिकृती मध्ये राष्ट्रध्वजाचा वापर करून राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी दाखल केला आहे.
१ नोव्हेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भव्य आकाश कंदिलाचे अनावरण अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले होते. यात राष्ट्रध्वजाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. या बाबत कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्थानकात राष्ट्र गौरव प्रतिष्ठा अवमान अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस एफआयआर मध्ये आरोपीचे नाव अज्ञात म्हणून टाकण्यात आलेले आहे. पोलिसांनी सदर झेंड्याची प्रतिकृती ही जप्त केली आहे.
राष्ट्रध्वज संहिते अनुसार आपला राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ हा देशाच्या सन्मानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. तिरंग्याचा अवमान होऊन नये याकरिता ‘राष्ट्रध्वज संहिता’ बनविण्यात आली आहे. विविध नियम करण्यात आले आहेत, तर त्याच्या चुकीच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा हा कायद्याचा गुन्हेगार तर आहेच किंबहुना देशद्रोही आहे. भारताच्या महानतेचे प्रतीक असणाऱ्या या तिंरग्याची आचारसंहिता १९६४ साली सी. व्ही. वारद यांनी लिहिली. ध्वजारोहण, अभिवादन, ध्वजावतरण आणि ध्वजाचा सन्मान कसा करावा, याबाबत एक नियमावली बनविण्यात आली. त्यालाच ‘राष्ट्रध्वज संहिता’ असे म्हणतात. या अनुसार हा अजामीनपात्र गुन्हा आहे.
याबाबत मनपा सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भव्य आकाश कंदिलाचे अनावरण करीत मतदारांना जागृत करण्यासाठी ही थीम साकरली होती. याबाबत मनपाला कोणाची तक्रार प्राप्त नव्हती असे सांगितले गेले.
-कुणाल म्हात्रे