क.डों.म.पा.चे मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांनी महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांच्या ऐतिहासिक समाधीस्थळाच्या जिर्णोद्धारासाठी आपला खारीचा वाटा पुढे केला आहे. यासाठी त्यांनी ५१ हजार रुपयांचा धनादेश ‘राजे प्रतिष्ठाण दुर्गसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य’कडे सुपुर्द केला आहे.
१५ ऑगस्ट देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राजे प्रतिष्ठाणने माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राजे प्रतिष्ठाणचे प्रदेशाध्यक्ष राहुल महाजन यांनी माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या समोर समाधी स्थळाचा आराखडा ठेवला आणि संपूर्ण कामाची इत्यंभूत माहिती त्यांना दिली. छत्रपती शिवरायांना आपले प्रेरणास्थान माननारे नगरसेवक अभिमन्यु गायकवाड यांनी देखील या जिर्णोद्धाराकरिता स्वतः खारीचा वाटा पुढे केला असून ५१ हजार रुपयांचा कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाण कडे सुपूर्द केला आहे. तसेच राजे प्रतिष्ठाणच्या संपूर्ण संस्थेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या राजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष राहुल महाजन हे ऐतिहासिक कल्याण शहरात वास्तव्यास आहेत. त्यांनी प्रतिष्ठाणच्या वतीने दुर्ग संवर्धन तसेच समाधी स्थळांच्या जिर्णोद्धाराचा विडा उचलला आहे. या मोहिमेत आर्थिक पाठबळ असणे देखील तितकेच गरजेचे असून लोकनिधीतून ते निधी जमा करीत आहेत. यासाठी त्यांनी अभिमन्यू गायकवाड तसेच मदत केलेल्या इतरांचेही आभार मानले आहे. याबद्दल MH मराठीने माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड तसेच राजे प्रतिष्ठाण प्रदेशाध्यक्ष राहुल महाजन यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी MH मराठीला आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून राजे प्रतिष्ठाणने माझी भेट घेतली. त्यांनी माझ्या समोर महाराणी येसूबाई व महाराणी ताराबाई यांच्या समाधी स्थळाच्या जीर्णोद्धाराचा आराखडा ठेवला. अध्यक्ष राहुल महाजन यांनी काही ऐतिहासिक घटना आणि कालांतराने आजची परिस्थिती निदर्शनास आणून दिली. मुळात आपण या महाराष्ट्रात राहतो असं म्हणण्यापेक्षा आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत राहतो. या नात्याने आपले काहीतरी कर्तव्य बनते की आपण अशा उपक्रमासाठी नक्कीच पुढाकार घ्यावा. यासाठी आर्थिक पाठबळ देखील महत्वाचे असते म्हणून मी माझा खारीचा वाटा म्हणून एक कर्तव्य निधी राजे प्रतिष्ठाणकडे दिला आहे. माझी अशी इच्छा आहे की लवकरच हे समाधी स्थळ उभं रहावं आणि यासाठी इतरांनीही आपल्या परीने फुल ना फुलाची पाकळी कर्तव्य निधी म्हणून द्यावी.
– अभिमन्यू गायकवाड (मा.नगरसेवक,क.डों.म.पा.)

कल्याणचे भूमिपुत्र मा.नगरसेवक अभिमन्यूशेठ गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली. महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांचे ऐतिहासिक समाधीस्थळ कसे असेल याचा आराखडा त्यांना दाखवला. त्यांनी या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. व ५१ हजार रुपयांचा एक कर्तव्य निधी स्वराज्य कार्यासाठी अर्पण केला. याबद्दल राजे प्रतिष्ठाण कडून त्यांचे मनापासून धन्यवाद. महाराणी येसूबाई आणि महाराणी ताराबाई यांचं स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान होत. त्यांनी शत्रुसमोर आपली चांगलीच जरब बसवली होती. त्यामुळे आता आपलं कर्तव्य म्हणून आम्ही हा समाधी स्थळ जीर्णोद्धाराचा उपक्रम हाती घेतला आहे. सद्या खोदकाम वगैरे झालेले आहे. पावसाळा संपल्या नंतर पुढील कामाला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी ज्याला जसे जमेल तशी मदत तुम्ही करू शकता. मदत नव्हे तर हे स्वराज्यासाठी आपले कर्तव्य आहे असे आपण म्हणू.
– राहुल महाजन (अध्यक्ष, राजे प्रतिष्ठाण दुर्ग संवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य)
– संतोष दिवाडकर