गणेशोत्सवात गणपती विसर्जनासाठी केडीएमसीची यंत्रणा सज्ज असून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी येथील गणेश घाटाची पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार, शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली, कार्यकारी अभियंता सुभाष पाटील उपस्थित होते.
गणेश भक्तांच्या सोयीसाठी दुर्गाडी गणेश येथे गणेश घाटाची उंची वाढविणे आणि गणेश घाट परिसरात लादया बसविणे ही कामे पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे या परीसरात 125 KV चे 3 जनरेटर, 11 लाईटिंग टॉवर, 80 हॅलोजन, 4 cctv तसेच दुर्गामाता चौक येथे 8 ccstv देखील विदयुत विभागामार्फत लावण्यात आले आहेत. दुर्गाडी येथे सरंक्षक भिंत बांधणे, गणेश घाटाला स्टिल रेलींग करणे आणि गणेश घाट बगीचा सुशोभिकरण करणे हि कामे प्रस्तावित असून सदर कामे शीघ्र गतीने करणे बाबत आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिका-यांना निर्देश दिले आहेत.

गेल्यावर्षी गणेशोत्सवानंतर महापालिका क्षेत्रात कोराना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढली होती. त्यामुळे यावर्षी सर्व गणेश भक्तांनी कोरोना नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. तसेच विसर्जन आपल्या दारी हा उपक्रमही महापालिका क्षेत्रात राबविला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
दुर्गाडी येथील गणेश घाट परिसरात “पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा पुरविण्याकरीता अनुदान” या योजने अंतर्गत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सुचविलेल्या महापालिका क्षेत्रातील गणेश घाट परिसरातील कामांसाठी एक कोटी दहा लाख इतक्या रकमेचे अनुदान मंजूर झाले असून त्यापैकी 55 लाख रुपयांचा निधी महापालिकेस प्राप्त झाला आहे. उर्वरित अनुदान सर्व काम पुर्ण झाल्यावर प्राप्त होणार आहे.
-कुणाल म्हात्रे
