कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला होता. आता ही लाट पूर्णपणे ओसरून गेली असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आज दि.१९ जून रोजी या दोन्ही शहरात एकूण ३२ रुग्ण आढळले आहेत.
क.डों.म.पा. क्षेत्रातून कोरोना कमी होत असल्याने सध्या येथील शहरवासीय मास्क हटवून मोकळा श्वास घेऊ इच्छित आहेत. कारण दुसऱ्या लाटेने सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता. दिवसागणिक २० हुन अधिक लोकांचे जीव जात होते तर दिवसाला २४०० रुग्ण सापडल्याचा ही रेकॉर्ड बनला होता. मात्र आता हे आकडे पूर्णतः वधारले आहेत. मागील दोन दिवसात कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झालेली नाही. तर आज १२५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. शिवाय आज फक्त ३२ रुग्ण आढळले आहेत. यातील निम्मे रुग्ण कल्याण तर निम्मे रुग्ण डोंबिवलीचे आहेत. महापालिकेने केलेल्या विभागवारी नुसार कल्याण पूर्वेत ६, पश्चिमेत १० तर डोंबिवली पूर्वेत १० आणि पश्चिमेत ६ रुग्ण आढळले आहेत.
आज दि.१९ जून रोजीच्या नव्या आकडेवारी नुसार आता महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे एकूण १३०६ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची लाट ओसरली असली तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासन करीत आहे.
-संतोष दिवाडकर