३ जून २०२१…. गुणेश डोईफोडे सरांनी सकाळी सकाळी या जगाचा निरोप घेतला. सकाळी उठल्यानंतर ऐकलेल्या या दुःखद बातमीवर विश्वास करणे खूप कठीण होऊन बसले. हृदयविकाराच्या झटक्याने अचानक त्यांना देवाज्ञा झाली आणि संपूर्ण विद्यार्थी वर्ग हळहळला.
शाळेत असताना व्हिलन प्रमाणे वाटणारे परंतु प्रत्यक्ष जीवनात हिरो असणारे आमचे गुणेश सर आज आमच्यात नाहीत. खरं तर अजूनही वाटत नाही की त्यांचं असं झालं आहे. चालता बोलता ते निघून गेलेत. रोज त्यांचे स्टेट्स पाहायला मिळायचे. विद्यार्थी मोठे झाले पण रोज काही ना काही ज्ञानात भर पाडणे त्यांनी सोडले नाहीत. व्हॉट्सऍप ग्रुप असो किंवा पर्सनल बोलणं. सरांनी प्रत्येक क्षणाला काही ना काही नवीन शिकवण्याचा प्रयत्न सोडला नाही.
आजपासून १७ वर्षांपूर्वी… चौथ्या इयत्तेत शिकत होतो. आणि वर्गातल्या मुलांमध्ये एक चर्चा सुरू होती. त्यातील दोघा तिघांनी गुणेश सरांचा मार खाल्ला होता. असे असे सर आहेत त्यांचा पासून सावध रहा असे सर्व पोर म्हणत होती. हे गुणे सर कोण ? तेव्हा सरांना मोस्ट ऑफ गुणे सर म्हणत. शाळा सुटताना चौथ्या माळ्यावरून गोंगाट करत खाली येणारे आम्ही पहिल्या माळ्यावर शांतपणे चालायचो. कारण इथेच गुणे सर उभे असायचे. आणि मी पहिल्यांदा त्यांना पाहिले. डोळ्यावर चष्मा आणि त्यातून करडी नजर, फॉर्मल राहणी. पुढच्या वर्षी पासून ते आपल्याला शिकवणार याची भीती आम्हाला लागलेली. ते आमच्या वर्गाला नकोत असे त्यावेळी वाटे. पाचवी झाली सहावी झाली. पण नेमके सातवीत गेल्या नंतर विज्ञान शिकवायला ते आम्हाला आले. त्यावेळी परीक्षा म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी. म्हणजेच 20 गुणांच्या चाचणी परीक्षा. पहिल्याच चाचणी परीक्षेत बरेच विद्यार्थी विज्ञान विषयात फेल झाले. मी कसाबसा काठावर पास झालो. पण सगळ्या वर्गाने हातावर छड्या खाल्ल्या. पुढे आम्हाला त्यांची सवय बनली. त्यांचा तास सुरू झाला की वर्ग शांत होत असे. ते वर्गात येऊ न येऊ वर्ग शांत होत असे. एक तास संपलेले शिक्षक बाहेर पडले की गुणे सर दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला वर्गात येत असत. सहामाई परीक्षा संपली आणि इतिहास हा विषय देखील ते शिकवू लागले. तसा हा विषय आम्हाला शाळेच्या मुख्यध्यापिका शिकवायच्या. पुढे त्यांनी तो ही विषय गुणे सरांना दिला.
एके दिवशी मधली सुट्टी संपलयाची घंटा कानावर पडली. आता गुणे सरांचा तास. वर्गातली पोर धावपळ करीत जागेवर बसली. इतिहासाची पुस्तक दप्तरातुन बाहेर पडून बेंचवर आली. जो धडा आज सर शिकवणार तो ही काढून ठेवला. दाराला डोळे खिळले. ५ मिनिटे झाली सर येईना. १० मिनिटे झाली सर येईना. म्हणजे हा ऑफ पिरेड दिसतोय. वर्गात हळूहळू आवाज सुरू झाला. आमच्या बेंच वर हळूहळू मस्ती सुरू झाली. मी त्या दिवशी कडेला बसलो होतो. मध्य भागी माझा मित्र सागर आणि भिंतीकडे धीरज. पाठीमागे तीन मुली बसल्या होत्या. मी खिशातला रुमाल काढून तो डोक्यावर ठेवला आणि अरबी लोकांसारखा डान्स करू लागलो. या पाचही जनांनी मला प्रोत्साहन दिलं. आणि मला आणखी एकदा नाचायला सांगितलं. मी पुन्हा नाचायला लागलो तोच अचानक वाऱ्याच्या वेगाने सर वर्गात शिरले आणि खुर्चीवर बसले. डोळ्यावर रुमाल असल्याने मला काही दिसले नाही. पण सरांनी मला पाहिले हे सर्वांना माहीत होते. आजूबाजूला कुजबुज सुरू झाली. एकसाथ नमस्ते म्हणत सरांचे स्वागत झाले. आणि आम्ही बसलो.
“ते दोन बेंच उभे रहा” सर म्हणाले.
बापरे ! आता काय खरं नाय… आम्ही हळूहळू घाबरत घाबरत उभे राहिलो. आणि ते बाहेर निघून गेले. ते पट्टी आणायला गेलेत हे आम्हाला कळलं. आणि ते वर्गात आले आणि खुर्चीवर बसले.
“चला या लवकर लवकर पुढे या” सरांनी आम्हाला पुढं बोलवलं.
या पाचही जणांनी मजा घेतली आणि सगळं माझ्यावर ढकलून मोकळे झाले.
“सर मी फक्त हसले हा दिवाडकर नाचत होता” त्यातली एक मुलगी म्हणाली.
सरांनी तिघींना चार चार छड्या ओढल्या ते पण वेताच्या काठीने.
“हम्म काय मग कसा होता डान्स ?” सागर आणि धिरजला विचारत दोघांना बिब्बार चार चार फटके ओढले. बिचारे हात चोळत जागेवर गेले. आता माझी बारी होती. मला माहित होतं मुख्य आरोपी असल्याने माझं काय खरं नाही. समोर गुणे सर. काही होण्या आगोदरच मी लटपट लटपट करू लागलो. हात थरथर कापायला लागले. चौथीत असल्या पासून ज्यांच्या पासून स्वतःला वाचवत राहिलो. आज शेवटी त्यांच्या समोर उभा आहे. मी पुरता घाबरलो.
“अरे तू तर… त्यांचा मेन रिमोट कंट्रोल आहे.” सर असं म्हणतात मी जाणले की मला लय बेदम मारतील वाटत.
मी एकदम गरीब आणि निरागस चेहरा केला. माझा चेहरा पाहून सरांचा मूड बदलला त्यांना मला मारावेसे वाटेना. पण बाकीच्या पोरांना मारलं आणि मी मुख्य आरोपी मग मला कस सोडावं. अक्खा वर्ग बिनपैशाचा तमाशा बघत होता.
“काय रे काय झालं ? रडतो काय ? मघाशी कसा नाचत होतास ?” सर बोलले.
“सर नाय मला ते लोक बोलले डान्स कर.. म्हणून मी केला” मी पण खरं काय ते सांगितलं. माझ्या कडे पाच बोट केलीत म्हणल्यावर मला पण त्या पाच बोटांकडे एक बोट नको होय करायला. तसे आम्ही सगळे तितकेच सामील होतो.
“काय नाव काय तुझं ?” सरांनी विचारले.
मला आठवतंय मला नाव पण सांगता येत नव्हतं इतका मी घाबरलो होतो.
“काय रे ?” सर पुन्हा बोलले.
“संतोष दिवाडकर…” खाली मान घालून हळूच बोललो.
“चांगला नाचतोस रे… हात पुढे कर” फार वेळ न घालवता बोलले.
आता काय करावं सहन पर्याय नाही. असे म्हणत मी हात पुढे केला. खरं सांगतो मी मुख्य आरोपी असून मला सरांनी मारायचं म्हणून वरच्या वर चार फटके मारले. एक फॉर्मलिटी बाकीच्यांना दाखवायचं म्हणून त्यांनी मला मारलं हे मला समजलं. जागेवर गेलो आणि शांत बसलो.
पुढे त्यांच्या सोबतची ही आठवण मी शाळा संपल्या नंतर २०१६ मध्ये शेअर केली. जेव्हा एका कार्यक्रमात माझी त्यांच्याशी भेट झाली. काही माजी विद्यार्थ्यां समवेत माझी ओळख करून दिली. आणि आमच्या जनशक्ती स्टुडिओ मध्ये त्यांच्या ग्रुपचा एक प्रोग्रॅम आयोजित केला होता. तो त्यांनीच विद्यार्थ्यांसाठी करून घेतला होता. यानंतर सर माझ्या संपर्कात कायम राहिले.
२०२१ च्या एका सकाळी सरांबाबतची बातमी ऐकून विश्वासच बसला नाही. रोज त्यांना स्टेट्स मागायचो. आणि ते ही कंटाळा आला असला तरी पाठवायचे. शाळेत असल्या पासून शाळेतील विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन ते आतापर्यंत करीतच होते. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या बद्दल एक आदरपूर्वक दरारा आजही कायम आहे. सर फार लवकर सोडून गेले हेच दुःख.
भावपूर्ण श्रद्धांजली…
– तुमचाच आजी माजी विद्यार्थी