कोरोना नियम असताना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणे भाजप पदाधिकाऱ्यांना महागात पडले आहे. सर्वसामान्य जनतेला नियम आणि राजकीय नेते आणि पक्षांना वेगळा न्याय याबाबत जनतेत वेगळी भावना पसरली होती. याचे गांभीर्य ओळखत पोलीस प्रशासनाने “जन आशिर्वाद यात्रा” आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांवर कोविड १९ नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हे नेते केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे आयोजक होते. भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील ठाणे जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रा आयोजित करत आहेत. मंगळवारी त्यांच्या भेटीचे आयोजन डोंबिवली पूर्व मध्ये डोंबिवली नागरिक सहकारी बँक चौक, सोनार पाडा कल्याण शील रोड वर देखील करण्यात आले होते. या घटनेत पोलिसांच्या मनाई आदेश आणि कोविड -१९ प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करण्यात आले. प्रचंड गर्दी पाहाता आणि कोरोनाची गांभीर्य विसरलेल्या भाजपा पदाधिकारी व नेते यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

यासंदर्भात मानपाडा पोलिसांनी माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर परब, भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजप उत्तर भारतीय मोर्चा डोंबिवली ग्रामीण मंडळ अधिकारी संजय तिवारी, दत्ता मळेकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर खडकपाडा, महात्मा फुले व कोळसेवाडी पोलीस ठाण्यातही विविध पदाधिकार्यांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे.
-रोशन उबाळे
