केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रे संदर्भात कोरोना काळात गर्दी जमावल्या प्रकरणी कल्याण डोंबिवली च्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यातील मानपाडा पोलीस ठाण्यात देखील काही पदाधिकार्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या पदाधिकार्यांवर गुन्हे का दाखल झाले नाहीत असा सवाल सध्या विचारला जात आहे.
केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या स्वागतचा कार्यक्रम मानपाडेश्वर मंदिर येथे घेऊन कोरोना काळात गर्दी जमवील्या प्रकरणी गुन्हे का दाखल नाहीत ? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. आगरी समाजातुन असलेल्या कपिल पाटील यांचा सत्कार सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या आगरी समाजाच्या नेत्यांनी मानपाडेश्वर मंदिर येथे घेऊन गर्दी जमवून देखील या बाबत गुन्हे का नोंद झाले नाहीत? हा वादाचा विषय ठरला आहे. सर्वपक्षीय संघर्ष समिती व राष्ट्रवादीचे नेते असलेल्या गुलाब वझे व दत्ता वझे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाची पोलिसांना माहिती नव्हती का? की डोळेझाक केली जात आहे? अशाप्रकारे दुजाभाव केला जात असल्याने नागरिकांत पोलिसांच्या भूमिकेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. एकाला एक न्याय आणि त्याच प्रकरणात दुसऱ्याला दुसरा न्याय हे खरंच खेदजनक आणि निषेधार्थ आहे. असा सूर उमटला जात आहे.

कोरोना महामारीची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली नसून शासनाने सर्वाना नियमाचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जाहीर केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे. भाजपने डोंबिवलीत जनआशीर्वाद यात्रा काढून नियम पायदळी तुडवल्याने मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या आदेशाचे पालन बंधनकारक असताना यात्रेत मनाई आदेशाचे उल्लंघन करत लोकांना एकत्र जमा करणे, मास्क चा वापर न केल्याने ४३६/२०२१ भा.द.वी.कलम १८८,२६९,२७० सह साथीचा रोग कायदा १८९७ चे कलम २,३,४ सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ५१ ( ब ) महा. पो.अधि.सन १९५१ चे कलम ३७ ( १ ) १३५ प्रमाणे आयोजकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
१८ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास जन आशीर्वाद कार्यक्रमा वेळी डोंबिवली नागरीक सहकारी बँक चौक, सोनारपाडा कल्याण शिळ रोड येथे जन आशीर्वाद यात्रा काढून नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भाजप पदाधिकारी मोरेश्वर भोईर, नंदू परब, शशिकांत कांबळे, संजय उर्फ बबलू तिवारी, दत्ता माळेकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मग बाकीच्यांना वेगळा न्याय का ? अशा चर्चा सध्या नागरिकांमध्ये तसेच राजकिय वर्तुळात सुरू आहेत.
-रोशन उबाळे
