कल्याण-डोंबिवली घडामोडी

डीपी रस्त्यात सुरू असलेल्या इमारतीच्या बांधकामावर क.डों.म.पा.ने चढवला बुलडोझर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून आता तर चक्क या अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांनी पालिकेच्या डीपी रस्त्याच्या जागेत देखील इमारती उभारल्या आहेत. अशाचप्रकारे आय प्रभागात दावडी गावातील तुकाराम चौक परिसरात डीपी रस्त्यामध्ये अनधिकृतपणे बांधकाम सुरु असलेल्या तीन मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आय प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी हि कारवाई ड प्रभाग अधिकारी सुधीर मोकल, इ प्रभाग अधिकारी भारत पवार, किशोर खुताडे यांच्या पथकांसह संयुक्तपणे केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास केला जात आहे. अनेक ठिकाणी डीपी रस्त्यांमध्ये अनधिकृत बांधकामे केलेली असून स्मार्ट सिटी बनविताना या बांधकामांचा अडथळा निर्माण होत आहे. अशाच प्रकारे दावडी येथील तुकराम चौक याठिकाणी विकासक राम लखन यादव यांनी येथील डीपी रस्त्यामध्ये तळ अधिक तीन मजल्यांच्या इमारतीचे बांधकाम केले होते. याआधी देखील या इमारतीवर दोन वेळा कारवाई करण्यात आली होती. तरी देखील पुन्हा हे बांधकाम केल्याने वास्तूविशारद संदीप पाटील यांनी याची तक्रार पालिकेकडे केली होती. या तक्रारीनुसार हि कारवाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांमध्ये घर घेणारे नागरिक देखील यामुळे देशोधडीला लागत आहेत. त्यामुळे अनधिकृत बांधकामांवर हे बांधकाम सुरु असतांनाच कारवाई होणे आवश्यक असल्याचे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी सांगितले.

या अगोदर एमआरटीपी प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आज आय, इ आणि ड प्रभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मानपाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे एकूण सुमारे ४० कर्मचारी, एक पोकलेन, एक गॅस कटर च्या सहाय्याने हि कारवाई केली असल्याची माहिती प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *