डोंबिवली :- मध्यरात्री उशिराने रस्त्याने घरी चालत जाणाऱ्या एका इसमास चाकू आणि कोयत्याचाधाक दाखवून पाच जणांनी लुटले होते. मात्र पोलिसांत तक्रार दिल्या नंतर या वाटमारू लुटारूंना डोंबिवली राम नगर पोलिसांनी आता अटक केली आहे.
संतोष कुमार शर्मा हे ठाकुर्ली येथील ९० फुटी रस्त्यावरून रात्री घरी चालत जात असताना अचानक काही लुटारूंनी त्यांची वाट अडवली. यानंतर या वाटमाऱ्यानी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील लॅपटॉप, मोबाइल, बॅग असा एकूण ४० हजार ४१० रुपयाचा वस्तू काढून घेतल्या. जीवाला घाबरलेल्या संतोष कुमार यांनी सर्व वस्तू त्यांना देऊन टाकल्या. मात्र या नंतर संतोष यांनी या संदर्भात राम नगर पोलीस स्थानकात झाल्या प्रकारची तक्रार दाखल केली.
डोंबिवली राम नगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत तपास सुरू केला. विशेष म्हणजे ही लूटपाट करताना कोणताही पुरावा मागे ठेवला नसल्याने गुन्हेगारांना शोधणे कठीण गेले. मात्र संपूर्ण कसोशीने तपास करून पोलिसांनी त्या पाच जणांचा सुगावा लावला. यात २० ते २५ च्या वयोगटात असलेले आशु दुमडा, कुणाल बोध, विशाल जेठा, सलमान पुहाल, गणेश लोट या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. हे तरुण डोंबिवली पूर्व येथील त्रिमूर्ती झोपडपट्टी परीसरात राहणारे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी.मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, समशेर तडवी आणि इतर सहकाऱ्यांनी या गुन्ह्याची उकल केली.
-रोशन उबाळे