मॉडीफाईड सायलेन्सर बसविलेल्या गाड्यांवर वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत असून यापुढे मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवर देखील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. डोंबिवली आणि कोळसेवाडी वाहतूक शाखेच्या वतीने १०३ मॉडीफाईड सायलेन्सरवर कारवाई करत हे मॉडीफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले होते. त्या सायलेन्सरवर ठाकुर्ली येथील ९० फुट रोड, म्हसोबा चौक येथे रोलर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
डोंबिवली शहरातील काही दुचाकी स्वार, आपल्या दुचाकीस कंपनीकडुन लावण्यात आलेल्या सायलेन्सर मध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज काढत शहरामध्ये फिरत असतात यामुळे ध्वनिप्रदुषण होत असून, आवाजामुळे सामान्य जनता विशेष करून वयोवृध्द नागरीक, रूग्ण, विद्यार्थी यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत होता.
या वाहनचालकांवर कारवाई करण्याच्या सूचना वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सहा पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, सहा.पोलीस निरीक्षक राजश्री शिंदे, पोलीस उप निरीक्षक नवनाथ चव्हाण, वाहतुक पोलीस अंमलदार, यांनी डोंबिवली शहरात विशेष मोहिम राबवून एकुण ८३ मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेवून या वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच कोळसेवाडी वाहतुक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सिरसाट, पोलीस उप निरीक्षक काशीनाथ चौधरी व वाहतुक पोलीस अंमलदार कोळसेवाडी यांनी कोळसेवाडी वाहतुक शाखेची हद्दी मध्ये २० मॉडीफाईड सायलेन्सर ताब्यात घेवून दंडात्मक कारवाई केली आहे. वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतलेले एकुण १०३ सायलेन्सर मॉडीफाईड असल्याबाबत आर.टी.ओ.कडून खात्री केली असुन, हे मॉडीफाईड सायलेन्सर हे बेकायदेशिर असल्याने त्याचा परत कोणाकडून वापर होऊ नये यांकरीता ते आज म्हासोबाचौक, ९० फुटी रोड, डोंबिवली पूर्व या रस्त्यावर मांडुन त्यावर रोलर फिरविण्यात आला.
यापुढेही वाहतूक पोलिसांच्या वतीने मॉडीफाईड सायलेन्सरवर कारवाई करण्यात येणार असून हे मॉडीफाईड सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजवर देखील महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
-कुणाल म्हात्रे