क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा आकडा कडक निर्बंधांनंतर काहीसा वधारलेला दिसत आहे. दिवसाला २ हजारांपर्यंत जाणारी रुग्णसंख्या साधारण १२०० पर्यंत आटोक्यात येत आहे. याहून दिलासादायक बाब म्हणजे मागील चार दिवसांत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ७५२२ रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.
राज्य सरकारने महाराष्ट्र भरात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर फिरणाऱ्या लोकांना व सेवा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नेमून दिलेली वेळ देखील कमी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश प्रशासनाला मिळत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा अधिक होत आहे.
मागील चार दिवसांत एकूण ७५२२ रुग्ण बरे झाले आहेत. या तुलनेत ५५७३ नव्या रुग्णांची नोंद चार दिवसांत करण्यात आली आहे. तर कोरोनाने महापालिका क्षेत्रात ३० लोकांचा जीव याच चार दिवसांत गेला आहे. या सर्व आकड्यांबरोबर आजच्या घडीला महानगरपालिका क्षेत्रात एकूण १४२५१ रुग्ण आता उपचार घेत आहेत. अनावश्यक कारणासाठी फिरणे टाळा, मास्क आणि सेनीटायजरचा वापर करा, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या असे आवाहन क.डों.म.पा.च्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.