नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी मानवी साखळी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या हाकेला प्रतिसाद देत कल्याणमध्ये ठिकठिकाणी मानवी साखळी करण्यात आली.
कल्याण पश्चिमेत सर्वपक्षीय नेते एकवटले
दि. बा. पाटील हे शेतकरी, वंचित, गोर गरीब, भूमिपुत्र, बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढले. त्यासाठी आज पूर्ण बहुजन समाज रस्त्यावर उतरला आहे. आगरी कोळी समाजाची जी मागणी आहे त्या मागणीला बहुजन समाज आणि भटके विमुक्त समाजाने देखील पाठींबा दिला आहे. खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी कोणतेही राजकारण व्हायला नको होते, कोणताही विरोध व्हायला नको होता. पण दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडीचे सरकार असून त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये राजकारण केले असून त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.
दरम्यान या आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर यांच्यासह प्रेमनाथ म्हात्रे, अर्जुन भोईर, संजय कारभारी, रवी गायकर, अर्जुन म्हात्रे, उल्हास भोईर, गणेश चौधरी, विनोद केणे, दिपक दोरलेकर, राहुल भोईर, शुभा पाध्ये, रेखा तरे, प्रिया शर्मा आदी सर्व पक्षीय पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांचा सहभाग
विमानतळाला नाव देण्याच्या मागणीसाठी कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील पुढे सरसावले आहेत. त्यांनी देखील या मानवी साखळीत सहभाग घेतला होता. हातात पोस्टर घेऊन ते स्वतः मानवी साखळीत जोडले गेले होते. मा.नगरसेवक अभिमन्यू गायकवाड हे देखील त्यांच्या समवेत उपस्थित होते.
मा.नगरसेवक कुणाल पाटील आंदोलनात सहभागी
कल्याण ग्रामीण भागात चक्की नाका ते नेवाळी नाका पर्यंत मानवी साखळी करण्यात आली. या आंदोलनाला मा. नगरसेवक कुणाल पाटील यांनी पाठींबा देत चक्कीनाका ते नेवाळी नाका पर्यंतच्या मानवी साखळीत सहभागी होत नवि मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात तिसगाव, नांदिवली,द्वारली, भाल, वसार आदी गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.