कल्याण भिवंडी रोडवरील नवीन दुर्गाडी पुलाच्या मार्गीकेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. या पुलाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा मध्ये चांगलीच चढाओढ रंगली होती. यासाठी पुलाच्या परिसरात दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केली होती. श्रेय घेण्याच्या अट्टहासात शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दुर्गाडी चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती पक्षाच्या झेंड्यांची झालर लावली होती. महाराजांच्या पुतळ्याच्या आसपास अशाप्रकारे राजकीय प्रदर्शन केल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना आपल्या श्रध्दा स्थानी मानतो. अशा युग पुरुषांच्या स्मारका ठिकाणी आपल्या पक्षीय प्रेमा पोटी विद्रुपीकरण करणे कदापी महाराष्ट्रातील शिवप्रेमी सहन करणार नाही. या प्रकाराचा, निष्क्रिय प्रशासनाचा आणि शासनाची यासंबंधी नियमावली असताना काम चुकारपणा करणार्या केडीएमसी प्रशासनाचा जाहीर निषेध असल्याची प्रतिक्रिया शिवप्रेमी सुभाष गायकवाड यांनी दिली.
महाराजांच्या पुतळ्याभोवती अशाप्रकारे राजकीय झेंडे लावणे हे निंदनीय असून, या प्रकाराबाबत संबंधित प्रभाग अधिकारी आणि पालिका आयुक्तांकडे तक्रार केली असल्याची माहिती शिवप्रेमी श्याम आवारे यांनी दिली.
– कुणाल म्हात्रे