कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्याच्या नजीक असलेल्या दुर्गा माता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची आणि स्मारकाची दुरावस्था झाली असून त्याची डागडुजी करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
५ जून रोजी “मराठी एकीकरण समिती कल्याण डोंबिवली” विभागाकडून ०६ जून रोजी झालेल्या “शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून दुर्गामाता चौक (दुर्गाडी) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याची आणि पुतळ्याच्या बाजुला असलेल्या स्मारकाची स्वच्छता ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि बाजार पेठ पोलीस स्टेशन यांची रीतसर परवानगी घेऊन ही स्वच्छता करण्यात आली.
हि स्वच्छता करतांना मराठी एकीकरण समिती कल्याण डोंबिवली विभागाच्या शिलेदारांना छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याची तथा बाजूला असलेल्या स्मारकाची दयनीय अवस्था दिसून आली. कल्याण शहरात प्रवेश करतांना डोळे स्वतःहून ज्याठिकाणी वळतात ते महाराष्ट्र राज्याचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या अश्वारूढ पुतळ्यावर तथा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या स्मारकावर आणि सदर स्मारकाची अवस्था पाहून कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेबद्दल शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.
यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पुतळ्याची आणि स्मारकाची डागडुजी करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीने आयुक्तांकडे पत्राद्वारे केली असून काही सूचना देखील केल्या आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या पायाला बुरशी सदृश्य पदार्थ निर्माण होत आहे. पायाच्या भागातून पुतळ्याचे पापुद्रे खाली पडत आहे. पुतळ्याच्या बाजूला असलेल्या स्मारकाच्या बाजूचे लोखंडी कुंपण हे तुटलेल्या अवस्थे मध्ये आहे. राज्याचे प्रतीक असलेली राजमुद्रा चे रंग निघून बेरंग अवस्थेमध्ये आहे. दगडी स्मारकाला लावलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या शिल्पाचे रंग निघून गेले आहे,शिल्पाचा काही भाग हा खाली पडत आहे.
स्मारकाच्या बाजूला खड्डे निर्माण होऊन त्यात पाणी साचून संपूर्ण कचरा आणि गाळ हा पाण्यात साचत आहे. स्मारकातील गवतावर लावलेले सर्व दिवे हे बंद तथा अकार्यक्षम झालेले आहे. पुतळ्याच्या मागे असलेले पांढरे दिवे हे पूर्णपणे कार्यरत नाहीत. पुतळ्यावर प्रकाश पाडणारे दिवे हे अकार्यक्षम झालेले आहे. पुतळ्याखाली असलेल्या खोलीत पाणी गळत आहे. स्मारकाच्या आत मध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या नकाशाचा रंग खराब होऊन नकाशाची शोभा खराब करत आहे. त्यामुळे यासर्व बाबींवर लक्ष देऊन योग्य ती डागडुजी करण्याची मागणी मराठी एकीकरण समितीचे कल्याण शहर समन्वयक भूषण पवार यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन शासनाच्यावतीने साजरा करण्यात येत असतांना ५ जून रोजी या पुतळ्याची आणि स्मारकाची स्वच्छता करण्यासाठी अग्निशमन विभागाकडून २ हजार रुपये आकारण्यात आले होते. हि बाब आयुक्तांना समजल्यावर हे पैसे परत करण्यात आलेअसले तरी हे निंदनीय असून आता या पुतळा आणि स्मारकाच्या डागडुजीसाठी प्रयत्नशील असून पालिका प्रशासनाने त्वरितयाकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उल्हास जामदार यांनी केली आहे.
-कुणाल म्हात्रे