अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडलेल्या प्रियकराने लग्नास विरोध दर्शविणाऱ्या मुलीच्या आईचा गळा दाबून जीवे ठार मारून तिचा मृतदेह गुरवली येथील जंगलात टाकून देणाऱ्या प्रियकरास टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे.
टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असणाऱ्या व बल्याणी येथे सोनी देवराज शेरवे (३९) आपल्या अल्पवयीन मुलीसोबत राहात होत्या. केडीएमसीच्या वडवली कार्यालयात हंगामी सफाई कर्मचारी म्हणून सोनी या काम करत होत्या. अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी गुरवली येथे राहत असणारा समीर बबन दळवी (२४) हा शुभेच्छा देण्यासाठी आल्याने मुलीच्या आईने या प्रेम संबंधाला विरोध दर्शविला होता. प्रेमसंबंधाला व लग्नाला विरोध केल्याने समीर व मुलीच्या आईची बाचाबाची झाली होती. राग अनावर झाल्याने मुलीच्या आईचा गळा दाबून तिचा मृतदेह गुरवली जंगलातील झाडाझुडपात समीरने टाकला होता.
सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने टिटवाळा पोलिसांनी ११ जुलै रोजी आकस्मिक गुन्ह्याची नोंद करून शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवेली ग्रामीण रुग्णालयात नेला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा गळा दाबून खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. शवविच्छेदनाच्या अहवालाने पोलीसही चक्रावले यासंदर्भात अल्पवयीन मुलीची कसून चौकशी केली असता आपला प्रियकर समीर बबन दळवी याला माझ्या आईने तुझी माझ्या मुली सोबत लग्न करण्याची लायकी नाही असे बोलल्याने वाद निर्माण झाल्याची माहिती पोलिसांना दिली.
टिटवाळा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी तपासाची चक्रे फिरवीत गुरवली येथे राहात असलेल्या मुलीचा प्रियकर समीर बबन दळवी याला चौकशी साठी ताब्यात घेताच आपण गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आज न्यायालयात त्याला हजर केले असता १७ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी दिली.
-कुणाल म्हात्रे