अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड ग्रामीण भागात तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे. या चक्री वादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या समवेत या भागात पाहणी दौरा केला.
तौक्ते वादळाने राज्यातील काही भागात थैमान घातले होते. या वादळाने अनेकांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवी म्हणून ठाणे जिल्ह्याचे पालमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी मलंगगड ग्रामीण भागात पाहणी दौरा केला. आणि गावोगावी भेटी देत शेतकऱ्यांशी चर्चा केल्या.
वादळीवार्याने शेलारपाडा गावातील प्रमोद दाभणे यांच्या घरावरचे छप्पर उडून गेले. अशावेळी शेलारपाडा गावातील एका ग्रुप ने संकटकाळी धावून मदतीचा हात पुढे केला. या वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याने तात्काळ ‘दाभणे मास्टर ग्रुप’ ने मदतीचा हात पुढे करत प्रमोद दाभणे यांना पत्रे बसवून देऊन तात्काळ मदत केली. या अगोदर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील रस्ता स्वखर्चाने तयार केला होता. तर आता नव्याने संकट येताच ग्रामपंचायत सदस्य दीपक दाभणे, पोलीस पाटील समीर दाभणे, मा.सदस्य धनाजी दाभणे यांच्या नेतृत्वात ‘दाभणे मास्टर ग्रुप’ हा वेळेला धावून येण्याची भूमिका बजावताना दिसत आहे. अश्याच संकटकाळी गरजुंना मदतीसाठी धावून येऊ असे या ग्रुपमधील युवा सदस्य संदेश दाभणे यांनी सांगितले आहे.
