राज्यातील राजकारणात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडी तयार करून सत्ता स्थापन केलेली आहे. पण त्या अगोदर अनेक वर्षे शिवसेना भाजप एकत्र राहिली आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला असं वाटत की शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार पुन्हा येऊ शकते. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कल्याण येथे केले। आहे.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सव प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आठवले यांनी उद्गार काढले. मलंगगड रोडवरील हॉटेल कशीश इंटरनेशनल येथे आज (दि.२९ ऑगस्ट) या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी भाजप शिवसेनेच्या वादात होणारे शाब्दिक चकमक वर भाष्य करीत प्रतिक्रिया दिली. शिवसेना व नारायण राणे यांच्यात सुरू असलेल्या वादावरून रामदास आठवले यांनी बोलताना सांगितले की, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा पध्दतीचे वाद आपल्याला चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. केंद्र आणि राज्यमार्फत हा वाद मिटला गेला पाहिजे.

नारायण राणे यांच्या वरील कारवाई ही सत्तेचा गैरवापर असून हा नारायण राणे यांच्यावर अन्याय आहे. असे या प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले. अशा पध्दतीने कारवाई करणे योग्य नाही असेही ते म्हणाले. शिवसेनेकडून वापरण्यात येणारी भाषाच नारायण राणे बोलले. ही भाषा ही शिवसेनेची भाषा आहे व यांच्यातच त्यांचे आयुष्य गेलेलं आहे. त्यांचे एवढे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. दोघांकडून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे ही शेवटी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले. क.डों.म.पा. निवडणूक काही महिन्यांवर आली असून आरपीआयची देखील तयारी सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही.
-रोशन उबाळे
