कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळ तेजश्री बिल्डिंग समोर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सूरु केले आहे.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे केंद्रीय, झोन व सर्कल सचिव पर्यंतचे पदाधिकारी यांची ऑनलाईन बैठक संघटनेचे कार्याध्यक्ष कॉमेड सि.एन.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. केंद्रीय पदाधिकारी बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्व सर्कल कार्यालय व झोन कार्यालया समोर साखळी उपोषण संघटनेच्या आदेशानुसार करण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी कल्याण परिमंडल कार्यलयात देखील करण्यात येत आहे. याद्वारे एक जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रात उभे करण्या बाबत सर्व पदाधिकारी यांनी तयारी दर्शविली.
तिन्ही कंपन्यातील प्रशासनाचे कामगार विरोधी धोरण दिवसें दिवस वाढत चालले असून त्या धोरणाला विरोध करण्याकरीता सुरुवातीला उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) यांच्या समवेत १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या चर्चेमध्ये मान्य झालेल्या मुद्द्यावर सुद्धा आजपर्यंत कोणतेही परिपत्रक निघाले नाही. याबद्दल महावितरण कंपनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन प्रशासनाची ही दादागिरी खपवून घेणार नाही अशी ही भूमिका संघटनेच्या नेतृत्वाने घेतली असल्याने केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार संयुक्त सचिव कॉम्रेड औदुंबर कोकरे व झोनल सचिव कॉम्रेड संतोष चचाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ तेजश्री बिल्डिंग समोर सोमवार पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
आज साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कल्याण परीमंडळा अंतर्गत सर्व कॉम्रेड सतीश म्हात्रे, जे आर पाटील, नारायण पाटील, बाळासाहेब महाले, नरेश थोरात, किशोर जयकर, सुरेश पाटणकर, पी आर बोटे, जगदीश धमके, प्रदीप म्हात्रे, नंदकुमार नाईक, साईनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी साखळी उपोषणाला बसले असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कल्याण झोन सचिव संतोष चचाणे यांनी दिली.
-कुणाल म्हात्रे