कल्याण पूर्व आमराई येथील राहणाऱ्या दोन तरुणांचा मलंगगड भागातील ओढ्याच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल घडली होती. २४ तासानंतर दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात NDRF च्या जवानांना यश आले आहे. या घटनेनंतर दोन्ही कुटुंब आणि आमराई परिसरात शोककळा पसरली आहे. तर झाल्या घटनेनंतर मलंगगड विभागात देखील हळहळ व्यक्त केली जातेय. इशांत मोहोडकर आणि विनायक परब अशी मृत तरुणांची नावे आहेत. दोघेही १८-१९ च्या वयोगटातील होते.
अशी घडली दुर्दैवी घटना :- संपूर्ण जिल्ह्यात गेली चार पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू होता. अनेक ठिकाणी पाणी साठले होते. नद्या,ओढे,नाले दुथडी भरून वाहत होते. पुलांवरून पाणी वाहत होते. निसर्गप्रलय सुरू असताना शहरी भागात राहणाऱ्या तीन तरुणांचा मलंगगड भागात वर्षा पर्यटनाला जाण्याचा मोह झाला. त्यांनी इतर मित्रांनाही संपर्क केला असेलच मात्र बाहेरील पावसाचा रुद्रावतार पाहता काहींना पर्यटनाला जाणे जमले नसेल. त्यामुळे इन मिन तिघेच मलंगगड भागात जाण्यास निघाले. दुपारी पावसाचा आस्वाद घेत तिघेही मलंगगड भागात आले. या भागातील चिंचवली भागात ते थांबले होते. आणि तितक्यात दोघांना पाण्यात उतरण्याचा मोह झाला. असं म्हणतात की आग आणि पाणी यांच्या नादाला कधीही लागू नये. प्रचंड पावसाने धो धो पाणी वाहत असतानाही ते दोघे पाण्यात उतरले. पावसा पाण्याचा त्या दोघांनाही अंदाज नव्हता. आणि प्रवाहा बरोबर ते दोघेही वाहून गेले. किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या त्यांच्या तिसऱ्या मित्राच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या डोळ्या देखत त्याचे दोन्ही मित्र निघून गेले होते. तेच शेवटचे क्षण आणि तीच शेवटची भेट. पोहता येत नसल्याने मी पाण्यात उतरलो नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
घटना घडल्यानंतर स्थानिकांना खबर देण्यात आली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. त्याअगोदर स्थानिकांनी देखील दोघे कुठे दिसतात का हे पाहण्याचा प्रयत्न केला. मात्र नजरेला पाण्याशिवाय काही पडत नव्हते. पोलिसांनी घाबरलेल्या तिसऱ्या तरुणास पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले. पाण्याचा प्रवाह इतका भयावह होता की त्यात शोधकार्य करणे अवघडच.
२४ तासांनी मृतदेहांचा शोध :- स्थानिक रहिवासी पाण्यात उतरून शोध घेत होते मात्र काही तपास लागत नव्हता. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी NDRF च्या जवानांची शोधमोहीम सुरू झाली. दुपारच्या सुमारास इशांत मोहोडकरचा मृतदेह शोधण्यास जवानांना यश आले. घटनास्थळी हिललाईन पोलीस, स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायतीची लोक, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मा. नगरसेवक महेश गायकवाड, पत्रकार असे अनेक लोक जमले होते. दुसऱ्या तरुणाच्या मृतदेहाचा शोध अनेक तासानंतरही लागत नव्हता. यानंतर स्कुबा डायव्हर्सला पाचारण करण्यात आले. पाण्याच्या तळाशी जाऊन शोधमोहीम पुन्हा सुरू झाली. आणि तासाभरातच दुसरा मृतदेह पाण्या बाहेर आला. विनायक परबचा हा मृतदेह होता. आणि यानंतर जवानांच सकाळपासून सुरू असलेला शोधकार्य सायंकाळी थांबलं.
कसे होते हे दोघे तरुण ? :- इशांत मोहाडीकर हा १९ वर्षांचा होता. तर विनायक परबचा १८ वा वाढदिवस अवघ्या १२-१३ दिवसांवर आला होता. मात्र त्या अगोदरच काळाने घाला घातला. दोघां बद्दल सांगायचं झालं तर दोघेही लहानापासूनचे एकाच चाळीत राहणारे बालमित्र. ‘ओम धर्मवीर’ या चाळीत दोघेही एकमेकांशी खेळत वाढले होते. दोघेही सामान्य घरातील होते आणि शिवाय घरच्यांना एकुलते एक असे वंशाचे दिवे होते अशी माहिती प्राप्त झाली आहे. दोघांच्या घरची परिस्थिती फारशी चांगली नाही. इशांतचे वडील वायरमन म्हणून कुटुंबाची उपजीविका करतात तर विनायकचे कुटुंबीय हातगाडी लावून छोटासा व्यवसाय करतात. ते पूर्वी राहत असलेली चाळ डेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी गेल्याने मोहाडीकर कुटुंबीय प्रतापगड चाळीत तर परब कुटुंबीय विशाल नगरीत राहत असल्याची माहिती आहे. परब हे पूर्वापार पासूनचे शिवसैनिक आहेत.
आई वडिलांनी आता काय करावं ? :- आज हे दोघेही मित्र जगाचा निरोप घेऊन निघून गेलेत. मात्र त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. जन्मदाती आई आणि संगोपन करणाऱ्या पित्याने आपल्या पोटच्या लेकराला गमावले आहे. ज्याच्यासाठी जगायचं तोच निघून गेल्याने जीवनाचा आधार हरपला असल्याचे दुःख त्यांना आता झाले आहे. प्रत्येक आई वडिलांच्या आपल्या मुलांवर जीव असतो. त्याचबरोबर काही स्वप्न, इच्छा, आकांशा या देखील असतात. मात्र नियतीने सर्वावरच पाणी फेरल आहे.
तमाम तरुणांना हात जोडून नम्र विनंती :- आणि विनायक सारख्या तरुणांना आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही तारुण्यात ज्या चुका करता जे निर्णय घेता त्या आधी स्वतःच्या जीवाची नाही पण घरच्यांची तरी पर्वा करावी. अश्या ठिकाणी फिरायला जाणे, नको ते साहस करणे जीवावर बेतणारे आहे. तारुण्य हे मजा करायचं वय आहे असे समजून जगा पण त्याचबरोबर आपण काय करतोय ? त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचाही विचार करा. घरातील तरुण मुलं घराबाहेर पडतात आणि अश्या घटना घडतात की त्या माता पित्यांना पुढील आयुष्यात फक्त अंधार शिल्लक राहतो. तरुणांनो आपल्या आई वडिलांचा विचार करा असे साहस करणे टाळा. मजहजा एका विशिष्ट पद्धतीने स्वतःची व इतरांची काळजी घेऊन करा. आज इशांत आणि विनायकच्या कुटुंबियांच्या मनाची जी अवस्था आहे ती पाहून तरी सावध व्हा. अन्यथा क्षणभराची मजा आयुष्याला सजा बनू शकते हे वेगळं सांगायला नको. हुल्लडबाजी बंद करून आई वडिलांसाठी जगा असं विनंतीवजा आवाहन तमाम तरुणांना हात जोडून करीत आहे. तुम्हाला यावर काय वाटतं ? कमेंट मध्ये अभिप्राय कळवा.
-संतोष दिवाडकर
खूप छान लिहिलं संतोष डोळ्यासमोर चित्रं उभे राहिले आणि अचानक डोळ्यातून अश्रू अनावर झाले