डोंबिवली जीआरपी पोलिसांनी खळबळजनक अशा हत्येची घटना उघडकीस आणली आहे. प्रेमाच्या विरोधात प्रेयसीच्या भावांनी तिच्या प्रियकराला महिन्याभरापूर्वी चालत्या ट्रेनमधून खाली फेकले होते. रेल्वे रुळावर जखमी अवस्थेत सापडलेला प्रेमी साहिल हाश्मी याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले .परंतु त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणात चौकशीनंतर जीआरपी पोलिसांनी साहिलच्या हत्येप्रकरणी मुलीचे वडील शब्बीर हाश्मी, कासिम हाश्मी, गुलाम हाश्मी यांच्यासह १० जणांना अटक केली.
डोंबिवली जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील रहिवासी साहिल हाश्मी हा एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता. गेल्या महिन्यात १५ जून रोजी साहिलने आपल्या प्रेयसीला पळवून नेले होते. १८ जून रोजी दोघेही रत्नागिरी एक्स्प्रेसने मुंबईकडे निघाले होते. त्यावेळी मुलीच्या वडिलांना समजले की आपली मुलगी साहिलसोबत पळून गेली आहे. आणि तिच्या वडिलांना राहवले गेले नाही.
मुलीच्या वडिलांनी आपल्या भावाला यूपीहून अंबरनाथ येथे फोनद्वारे माहिती दिली. त्यानंतर रत्नागिरी एक्सप्रेस १९ जून रोजी रात्री अकरा वाजता कल्याणला पोचणार होती. यापूर्वीच मुलीचा चुलत भाऊ आपल्या मित्रांसह कल्याण स्टेशनला पोहोचला. ट्रेन कल्याण येथे पोहोचल्यावर मुलीचा भाऊ आणि त्याचे मित्र ट्रेनमध्ये चढले आणि दोघांना शोधून काढले. साहिलला वाईट मारहाण केल्यानंतर आरोपींनी त्याला कोपर ते दिवा रेल्वे स्थानक दरम्यान चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकले.
सुरुवातीला पोलिसांना हा अपघात आहे असे वाटले होते, परंतु जेव्हा जीआरपी पोलिसांनी साहिलच्या नातेवाईकांशी बोलून सर्व बाबींचा बारकाईने शोध घेतला, तेव्हा सर्व तथ्य उघडकीस आले. साहिलच्या हत्येतील 10 आरोपींना डोंबिवली जीआरपीने अटक केली. एक आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
-संतोष दिवाडकर