घडामोडी

बाजारात पिशवी कापून चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या दोन महिलांना केली अटक; टिटवाळा पोलिसांची कामगिरी

टिटवाळा बाजारपेठेत एक महिला खरेदीसाठी गेली असता या महिलेची पिशवी तिच्या नकळत कापून दोन तोळे सोने लंपास करण्यात आले होते. ही बाब लक्षात येताच या महिलेने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल होताच कसून तपास केला आणि २४ तासांच्या आतच चोरी करणाऱ्या दोन महिलांना अटक केली.

कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत टिटवाळा बाजारपेठेत सोमवारी पार्वतीबाई बोराडे वय ५० वर्षे रा. टिटवाळा या महिला बाजारपेठेत खरेदी करण्याकरिता गेल्या असता त्यांच्या हातातील पिशवी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून पिशवीत ठेवलेले ५२ हजार रुपये किमतीचा सुमारे २ तोळे वजनाचा सोन्याचा ऐवज लंपास केला. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेच्या फिर्यादीवरून टिटवाळा पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

       या गुन्ह्यातील आरोपींचा कल्याण तालुका पोलिस स्टेशन  पोलिस उप निरीक्षक सुर्वे, पोलिस उप निरीक्षक काजोल यादव, पोलिस कर्मचारी तुषार पाटील, दर्शन सावळे, नितीन विशे, योगेश वाघेरे यांनी शिताफीने शोध घेवून सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या  गुन्ह्यातील दोन महिला आरोपी ज्योती अनिल धोत्रे वय २७  वर्ष राहणार आंबिवली आणि पिंकी मनोज साळुंके वय ३५ वर्ष राहणार आंबिवली यांना २४ तासांच्या आत ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असता आरोपी महिला यांना अटक करून पुढील कार्यवाही करत आहेत.

बाजारात खरेदी करण्यासाठी महिलांची झुंबड उडालेली असते. अशावेळी गर्दीचा फायदा घेऊन हातातली पिशवी धारदार शस्त्राच्या मदतीने नकळतपणे कापून त्यातील किमती माल गायब केला जातो. यात कोणाची पिशवी कापायची यावर अगोदरच पाळत ठेवली जाते. त्याच्या पिशवीत काय असेल ? याचा अंदाज घेतला जातो. आणि त्यानंतर आखो आखो मे इशारा करीत गर्दीमध्ये पिशवी कापून चोरटे रफू चक्कर होऊन जातात. आशा प्रकारणात अनेक महिला पोलिसांत तक्रार देणे टाळत असल्याने अशा चोरट्यांचा चांगलाच जम बसतो. या घटना शहरी भागात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे गर्दीत खरेदी करताना आपल्या किंमती ऐवजाकडे विशेष लक्ष देण्याची आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *