कल्याण-डोंबिवली घडामोडी लेख

भयानक थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या बेघरांना ब्लॅंकेट वाटप

कल्याण : भर थंडीत उघड्यावर झोपणाऱ्या गोरगरीब बेघरांना नागरी हक्क संघर्ष समितीने मकरसक्रांत आणि नामांतर दिवसाचे औचित्य साधून ब्लॅंकेटचे वाटप केले आहे. त्याचबरोबर गोरगरिबांना वस्तू दान करण्याचे आव्हान ही करण्यात आले आहे. दोन वर्ष करोनाचा कहर त्यात गरिबांचा कामधंदा गेला. खाण्याचे हाल, उघड्यावर दुकानाच्या आसऱ्याला झोपायचे, त्यात महा भयंकर थंडी. अशा परिस्थितीत काही लोक जगतात. त्यांचे जगणे रात्री अपरात्री फिरल्यावर समजते.

बैल बाजार स्मशान भूमि समोर स्मार्ट स्टोर जवळ एक तीस वर्षाचा व्यक्ती प्ल्यास्टिकच्या गोणीत स्वतःला टाकून थंडीत कुडकुडत झोपला होता. सर्व शरीर त्याने त्या गोणीत गुंडाळून घेतलेले होते. त्याला उठवले असता त्याने त्याची करुण कहाणी सांगितली. “साहेब काम धंदा नाही पोटाला अन्न नाही विदर्भातील थंडी पेक्षा ही त्या मानाने थंडी कमी. करोना मुळे कोणी काम देत नाही. मृत्यू पण येत नाही”. बोलतांना त्याच्या डोळ्यात पाणी होतेच मात्र ब्लॅंकेट मिळाल्याचे समाधानही.

अशीच एक प्लास्टिक पालव टाकलेली पाच दहा घर फोर्टीज हॉस्पिटलच्या मागे कल्याणच्या मध्यवर्ती पॉश वस्तीत अशी घर आहेत हेच आश्चर्य आहे. कल्याणच्या लोकांना, नेते आणि कार्यकर्ते म्हणवणाऱ्या लोकांना माणुसकी असेल तर त्यांनी जरा तिकडे फिरून यावे. पावसाळ्यात हे लोक कसे राहत असतील? असा विचार आला तर अंगावर शहारे आले. लाईट नाही, पाणी नाही. साप, विंचू, घुशी यांची भीती नाही. तरी लोक चिमुरडे घेऊन येथे राहतात. त्यांच्या कडे ढुंकूनही कोणी पहात नाही. अश्या बेवारस वस्तीत जाऊन सामाजिक भान ठेवून शनिवारी रात्री ब्लॅंकेट वाटन्यात आले.

अशीच एक स्वाभिमानी वयोवृद्ध आजी कृषी बाजार समितीच्या गेट वर सापडली. अंगावर फक्त साडी, विना स्वेटर केळ्याची पान आणि काही भाजी रात्री थंडीत विकायला बसली होती. आजी कुठून आली? विचारले असता ती म्हणाली जळगाव वरून. आता रात्र भर थंडीत राहणार काय? तर म्हणाली पोटा पुढे थंडी काय आहे पोरांनो? कुठून उर्मी येते यांना जगण्याची हे एक कोडे आहे. या घरात बसण्याच्या वयात ही म्हातारी एव्हड्या लांबून थंडीत केळीची पाने विकायला आली.
सलाम त्या आजीच्या स्वाभिमानाला.

लोक जेथे आसरा मिळेल तेथे झोपली होती. दुकानाच्या थंड गार लादीवर, अंगावर असेल तो पातळ कपडा, अंगाखाली काही नाही व त्यात डास. काही लोकांच्या म्हणन्यानुसार ते नशेडी म्हणून घोषित केले जातात. पण काही लोक नशा न करता ही झोपलेले होते. आणि ही त्यांची हौस नसून त्यांची मजबूरी होती. ज्याकडे येथील व्यवस्था आणि समाजाने दुर्लक्ष केले आहे.

१४ जानेवारीच्या रात्री ब्लॅंकेट वाटण्याच्या अनुभवाने एक रात्र वैऱ्याची, निसर्गाच्या थंडीच्या प्रकोपाची अनुभवायला मिळाली. रात्रीच भयानक वास्तव आणि स्मार्ट सिटी बनायला निघालेल्या शहराच काय होणार? लोक स्मार्ट केंव्हा होणार? माणसात माणुसकी केंव्हा येणार? असे अनेक प्रश्न घेऊन सकाळी पाच वाजता चार भिंतीच्या सुरक्षित ब्लॉकच्या घरात ब्लँकेट घेऊन झोपलो. स्वतःला,सुशिक्षित समजणाऱ्या समाजाला येथील भांडवलदारांना, राजकारणी नेत्यांना, लोकशाही म्हणून तीचा खून पाडणाऱ्या सत्ताधारी व्यवस्थेला शिव्या देत.

नागरी हक्क संघर्ष समिती तर्फे हे वाटप करण्यात आहे. माणुसकी मनात जिवंत असणाऱ्या लोकांच्या मदतीने रात्री जागून सामाजिक भूक भागवणारे कार्यकर्ते हजर होते. बाबा रामटेके, हेमंत कांबळे, अभिजित पंडित, राजू रणदिवे, अक्षय गायकवाड, प्रवेश सिंग, रमेश बर्वे, ऍड.सुनील चतुर्वेदी, कलाकार फोटोग्राफर मनोज घुसळे.

दरम्यान ब्ल्याॅंकेट वाटप कार्यक्रम पुढे दहा दिवस चालू राहणार आहे. ज्यांना नवीन ब्लॅंकेट/चादर देणे असतील त्यांनी स्टार ऑप्टिकल ताल बार समोर, मुरबाड रोड कल्याण पश्चिम येथे द्यावे. मदत करण्यासाठी पत्रकार बाबा रामटेके यांच्या ८०९७५४०५०६ नंबरवर संपर्क साधण्याचे संघटनेने आव्हान केले आहे.

-रोशन उबाळे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *