केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिल्ली वरून येतांना राज्यासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी केंद्राकडून किती लस आणल्या असा सवाल राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी केला असून भाजपाच्या या जनआशीर्वाद यात्रेमुळे नियंत्रणात आलेली कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच सीबीएससी शाळांना १५ टक्के फी कपात करण्यास राज्य सरकारने भाग पाडले असतांना केंद्राने या सीबीएससी शाळांवर कोणतीच कारवाई केली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय राज्य मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्रात आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. भाजपातर्फे काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेत देखील भाजपा कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. केंद्राकडून लसींचा साठा कमी येत असल्याने लसीकरणासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या हाणामारी देखील होत आहेत. असे असतांना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून कपिल पाटील यांनी केंद्राकडून महराष्ट्रासाठी, ठाणे जिल्ह्यासाठी किती लसी आणल्या असा सवाल किरण शिखरे यांनी केला आहे.

एकीकडे लसींची कमतरता असतांना जनआशीर्वाद यात्रेतून कोरोनाचा प्रसार आणखी होण्याची भीती असून कपिल पाटील यांनी याची काळजी घेण्याची विनंती शिखरे यांनी केली आहे. तसेच कोरोना लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती कोलमडलेली असतांना सीबीएससी बोर्डाच्या शाळांची सक्तीने फी वसुली सुरु आहे. यावर राज्यात महाविकास आघाडी सरकारने १५ टक्के फी कमी करण्याच्या सूचना या शाळांना दिल्या आहेत. मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या या शाळांवर केंद्र सरकारचा कोणताही अंकुश नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांनी या विषयात लक्ष घालून विद्यार्थी आणि पालकांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेतून कोरोनाचा धोका वाढेल असा टोला विरोधकांनी लगावला आहे. मात्र कोरोना प्रसाराची खबरदारी घेऊन कपिल पाटील या यात्रेत स्वतः मास्क वापरत असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे सभांना उपस्थित राहणाऱ्या पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच नागरिकांना देखील मास्क तोंडावर ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.
-कुणाल म्हात्रे