स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून कल्याण पूर्वेत भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते पाण्याची पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. या कामामुळे कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ८७ आणि प्रभाग क्र. १०३ मधील पाण्याची समस्या सुटणार असून २८ लाखांच्या आमदार निधीतून हि कामे होणार आहेत. यावेळी कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक मनोज राय, माजी सभापती सुभाष म्हस्के तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसगाव नाका येथील तिसाई हाउस या कार्यालयाठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर १३ लक्ष आमदार निधी मधून प्रभाग क्र.८७ मधील गावदेवी रोड वरील पराग व्हिला बिल्डींग पासून ते शंकर कॉम्प्लेक्स पर्यंत पाण्याची पाईप लाईन टाकणे या कामाचा शुभारंभ शंकर कॉम्प्लेक्स, गावदेवी मंदिर रोड, कल्याण पूर्व येथे करण्यात आला. या परिसरात २ ते ३ दिवसांनी पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावत होती. याबाबत परिवहन सदस्य तथा भाजपा कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांनी या कामासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार याठिकाणी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे.

तर १५ लक्ष आमदार निधी मधून प्रभाग क्र.१०३ ओम शिव गंगा कॉम्प्लेक्स, खडेगोळवली, कल्याण पूर्व परिसरात पाण्याची पाईप लाईन टाकणे या कामाचा शुभारंभ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, शंकर पावशे रोड, कल्याण पूर्व याठिकाणी करण्यात आला. येथील बहुतांश परिसर हा चाळींचा असल्याने या ठिकाणी पाण्याची समस्या नागरिकांना जाणवत होती. याबाबत स्थानिक नगरसेवक मनोज राय यांनी पाण्याची लाईन टाकण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा करत हे काम मार्गी लावले आहे.
-कुणाल म्हात्रे