रवींद्र चव्हाण : श्रीराम जन्मभूमी श्री अयोध्या धाम येथे महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवनच्या (भक्त निवास) वास्तूचे भूमिपूजन आज संपन्न झाले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी राज्य शासनाच्या अपर सचिव मनीषा म्हैसकर व अयोध्येचे खासदार व आमदार आदींची विशेष उपस्थिती लाभली.
अयोध्येत महाराष्ट्रामधून आलेल्या प्रभू बालक राम मंदिरात अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत अयोध्या नरेश प्रभू श्री राम यांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी आलेल्या राम भक्तांच्या निवासाची उत्तम व्यवस्था देण्याच्या हेतून अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले जात आहे. हिंदुत्वाचा मानबिंदू असलेले हे अयोध्येतील पवित्र राम जन्मभूमी मंदिर जगभरातील हिंदूंना नेहमीच एक सकारात्मक ऊर्जा देत असते. यावेळी बालक राम मंदिराच्या उर्वरित बांधकामाचीही पाहणी चव्हाण यांच्यासह मान्यवरांनी केली.
भूमिपूजन झाल्याने आता तेथे भवनाचे काम सुरू करून लवकरच त्याचे बांधकाम पूर्ण होईल आणि महाराष्ट्रामधून आलेल्या रामभक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी महाराष्ट्र शासनाचे हे महत्वाकांक्षी पाऊल असल्याचे म्हटले जात असल्याची प्रतिक्रिया अयोध्या परिसरातील मराठी बांधवांनी व्यक्त केली.