केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये आले होते. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवास ते उपस्थित राहिले होते. यावर त्यांना मनसे आणि भाजपा युती बाबत माध्यमांकडून रिपाईची भूमिका काय असेल अशी विचारणा केली होती. त्यावेळी ही युती अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
मनसेची भूमिका ही मराठी माणसाप्रति कट्टर आहे. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे मनसेशी युती करणे हे भाजपला परवडणारे नसून या युतीमुळे भाजपचे नुकसान होईल असा तर्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. जर मनसे सोबत युती करण्याचे विचार भाजपा कडून होत असेल तर मी युती न करण्याबाबत त्यांना सांगणार आहे. रिपाई असताना राज ठाकरेंच्या पक्षाची काही आवश्यकता नाही. मुंबईत इतर भाषिक लोक आहेत आणि त्यांचं समर्थन आमच्या युतीला आहे.

आगामी काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत देखील रिपाई भाजपा सोबतच असणार आहे. आमच्या पक्षाला जागावाटपात अधिकाधिक जागा मिळण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. असे आठवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर राज्यात शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं असाही दावा त्यांनी यावेळी केला.
-संतोष दिवाडकर
