अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागातील ओढ्यात प्रदूषित किंवा रासायनिक पाणी सोडल्याने ओढ्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. इतक्या माशांचा मृत्यू कसा झाला असावा ? हा प्रश्न पाहता या गंभीर प्रकरणात प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कल्याण जवळील मलंगगड परिसरात असलेल्या करवले कुंभार्ली येथील ओढ्यात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले आहेत. विशेष म्हणजे पाण्याला देखील तेलसदृश तवंग आणि पांढरा फेस आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रदूषणास कारणीभूत असलेल्या पोल्ट्री फार्म आणि कंपन्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र हे मृतावस्थेत असलेले मासे आणि खेकडे या परिसरातील आदिवासींनी उल्हासनगर, कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांसह ग्रामीण भागात देखील विक्रीसाठी नेले असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. त्यामुळे हे मासे जर कुणी खाल्ले तर विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता सध्या या परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र एवढी मोठी घटना होऊन देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कोणत्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पुढील काही दिवस परिसरातील नागरिकांनी नदीमधील मासे खाऊ नयेत असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
मलंगगड हा अंबरनाथ तालुक्यातील एक ग्रामीण भाग आहे. कल्याण पासून जवळ असल्याने कल्याणकर देखील मोकळी हवा घेण्यासाठी या भागात येतात. कारण हा भाग संपूर्णपणे निसर्गाने नटलेला आहे. परंतु आता या भागात काही ठिकाणी जीन्स बनवण्याचे कारखाने बनवले गेले आहेत. ज्यातून प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते. ओढ्यातून जाणाऱ्या शुद्ध पाण्यात हे पाणी मिसळल्याने या भागात जल प्रदूषण वाढीस लागले आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
-संदेश दाभणे