अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात रात्रीच्या सुमारास एका महिलेची चक्क टेम्पो मध्ये प्रसृती झाली. परंतु मुल जन्माला येताच त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ग्रामीण भागातील राजकीय चंगळीतुन बंद असलेल्या सरकारी रुग्णालयामुळे एका बालकाचा बळी गेला आहे का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
कल्याण शहरा पासून काही किमी च्या अंतरावर असलेला मलंगगड हा ग्रामीण भाग. या भागात मांगरूळ येथे एक सरकारी रुग्णालय आहे. मात्र स्थानिक राजकीय स्वार्थ आणि वादावादीमुळे डागडुजीचे कारण पुढे करत हे रुग्णालय सदा न कदा बंदच असते अशी येथे ओरड आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मलंगगड भागातील म्हात्रेपाडा कातकरी वाडीतील वंदना लक्ष्मण वाघे या महिलेला प्रसृतीकळा सुरू झाल्या. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने टेम्पो मधून तिला मांगरूळ येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हे रुग्णालय चक्क बंद अवस्थेत होते. त्यानंतर या महिलेला उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच या महिलेची प्रसृती झाली. आणि या महिलेच्या पोटी जन्म घेताच व्यवस्थित उपाययोजना न झाल्याने ते बाळ दगावले.
वर्षभरात अश्या ३ घटना घडल्या असल्याचे येथील लोक सांगत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी महिलेला ९ महिन्यातून फक्त एकच इंजेक्शन दिले असल्याचा संतापजनक आरोप देखील नागरिकांनी केला आहे. ग्रामीण भागातील ही आरोग्य केंद्र आणखी किती लोकांचा जीव घेणार आहे असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड ग्रामीण भागात सतत राजकीय पुढाऱ्यांची रेलचेल सुरू असते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच नेवाळी येथे फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण केले होते. मात्र असे जरी असले तरी या भागात आरोग्याचा प्रश्न काय आहे ? हे या घटनेतून पुढे आले आहे. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी आरोग्य सोयी सुविधां साठी आणखीन गांभीर्याने विशेष लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे दिसत आहे. या भागात आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर एकही रुग्णालय उपलब्ध नाही. विशेष म्हणजे मांगरूळ येथील रुग्णालय हे डागडुजीचे कारण देऊन लोकांच्या आरोग्य आणि जीवाशी हेळसांड करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडवणार तरी कोण ? गरिबांचा वाली आहे तरी कोण ? की नुसताच राजकीय स्वार्थातून असे बळी जात राहणार ? असा सवाल येथील गावकरी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विचारत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आता स्वतःच अश्या गोष्टींची गंभीरपणे दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
-संदेश दाभणे