मुरबाड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दरम्यान याच तालुक्यातील पत्रकार जीवन शिंदे यांनी कोविड सेंटरमध्ये काम करण्याची मागणी प्रशासनाकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे. मला मानधन दिले नाही तरी चालेल पण सेवेत घ्या असेही त्यांनी प्रशासनाला सूचित केले आहे. मात्र पत्रकार जीवन शिंदे यांच्या या अजब मागणीकडे प्रशासन कानाडोळा करीत असल्याचे सध्या तरी दिसत आहे.
गेल्या महिनाभरापासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. याचबरोबर मृत्युदर देखील चिंतेचा विषय बनू लागला आहे. व्हेंटिलेटर बेड,ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर या सर्व समस्यांनी सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. मुरबाडचे पत्रकार जीवन शिंदे यांनी मुरबाड तहसीलदार, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे एक लेखी अर्ज केला आहे. या अर्जात त्यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये काम मिळावे अशी मागणी केली आहे. याचबरोबर मी विना मोबदला काम करायला तयार आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. एक पत्रकार कोविड हॉस्पिटलमध्ये विना मोबदला काम करण्याची का इच्छा करतोय ? या विचारात प्रशासनातील एक वर्ग पडला असल्याचे सध्या दिसत आहे. कोणत्याही प्रकारचे उत्तर प्रशासनाने जीवन शिंदे यांना अध्याप दिलेले नाही. पत्रकाराची मागणी ही प्रशासना समोर एक प्रकारचे आव्हानच असेल असा सूर समाज माध्यमांवर लावला जातोय.
