वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आणि छ. शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कल्याण शाखेतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी कल्याण पूर्वेकडील, पत्री-पूलाजवळील नेतवली टेकडीवरील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला.
संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत देडगे यांच्या निवासस्थानी छ. शाहू महाराजांना अभिवादन करून नेतिवली टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पळस, महोगनी, जांभूळ, सीताफळ, साग, बांबू, पळस, बकुळ आदी प्रकारची ३० रोपे लावण्यात आली.
महा. अंनिस द्वारा आयोजित या वृक्षारोपणास ‘समता संघर्ष’ संघटनेचे प्रमुख शैलेश दोंदे, ‘पुरोगामी विचार मंच’चे महाराष्ट्र राज्य प्रमुख बंडू घोडे, व्यावसायिक जगदीश ठाकूर, ‘अंघोळीची गोळी’ मोहिमेचे तसेच महा अंनिसचे कार्यकर्ते अविनाश पाटील, महा. अंनिस कल्याण, डोंबिवली शाखेचे पदाधिकारी, जिल्हा राज्य पदाधिकारी आणि अनेक जुने-नवे कार्यकर्ते तसेच स्थानिक तरुण मुले आणि समाजसेवक हजर होते. सर्वांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.
वृक्षारोपणासाठी जागा निवडणे, खड्डे खोदणे, कार्यकर्त्यांना अल्पोपहार यासाठी हनुमंत देडगे यांनी, नियोजनासाठी शरद लोखंडे, दत्ता बोंबे, तानाजी सत्वधीर, शुशील माळी यांनी मेहनत घेतली. तसेच शाखा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी नियोजनासोबतच कृषि पर्यवेक्षक डी वाय कोळी यांच्या मदतीने रोपे उपलब्ध करून दिली.वृक्षारोपण झाल्यावर शरद लोखंडे यांनी या कार्यक्रमामागील संकल्पना समजाऊन सांगितली तसेच केवळ वृक्षारोपण करूनच थांबायचे नाही तर ही रोपे जगविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मधून मधून वृक्षारोपण ठिकाणी येऊन रोपांना पाणी घालणे, त्यांची निगा राखणे ही कामे सुद्धा करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. अविनाश पाटील यांनी अंघोळीची गोळी, खिळेमुक्त झाड या उपक्रमांची माहिती दिली.
-कुणाल म्हात्रे