लेखन :- संतोष दिवाडकर
मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर आता प्रसिद्धीच्या एका झोतात उतरले आहे. गावातील तरुणांच्या व्हॉट्स अप स्टेट्स आणि इन्स्टाग्रामच्या स्टोरी मुळे हे मंदिर इतकं लोकांपर्यंत पोहोचलं आहे की पुण्यातील लोक या मंदिराकडे आता गर्दी करू लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पर्यटकांचा वावर हा मागील १० वर्षांपासून प्रचंड वाढीस लागला आहे. त्याचे कारण म्हणजे या तालुक्याला निसर्गाने दिलेल्या सौन्दर्याची देणं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. आणि स्वराज्यातीलच काही महत्त्वाचे किल्ले याच तालुक्यात ताठ मानेने आभाळ स्पर्शीत आहेत. लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग सारखे अभेद्य किल्ले, भुशी आणि पवना सारखी धरण, टायगर, लायन पॉईंट सारखी उंच ठिकाण, कारल्याची एकविरा देवी, येथील लेण्या आणि जंगले येथील पर्यटनाचे मुख्य स्रोत आहेत. यामुळे ऋतू कोणताही असो ईथे पर्यटन संपत नाही. मुंबई पुण्याहून येणाऱ्या पाव्हन्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी दर शनिवारी रविवार हा मावळ प्रांत जणू काही सज्जच असतो.
काय आहे मंदिराचा इतिहास ?

मावळ तालुक्यातील पवना धरणा जवळ असलेले शिळीम हे गाव. या धरणाला लागून असलेल्या वाघेश्वर या खेडेगावावरून येथील एका पुरातन मंदिराला वाघेश्वर शिवमंदिर म्हणून ओळख मिळाली आहे. तिकोणा किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्यापासून बरोबर समोरच हे मंदिर उभे आहे. काही जाणकारांनी हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचे सांगितले तर काहींनी हे मंदिर त्याही पेक्षा पुरातन म्हणजे हेमाडपंथी असल्याचा दावा केला आहे. हे मंदिर नेमके कधी बांधले ? हा शोध लावण्यासाठी अद्याप कोणत्याही इतिहास संशोधकाने या मंदिराला भेट दिली असल्याचे ऐकण्यात नाही. त्याचे कारण म्हणजे मुख्य रस्त्या पासून आडबाजूला हे मंदिर उभे आहे.
सोशल मीडियामुळे मंदिर प्रसिद्ध

पवना धरणाची निर्मिती झाल्या नंतर पावसाळ्या पासून वर्षातील अर्ध्यापेक्षा जास्त काळ हे मंदिर खोल पाण्यात सामावलेले असते. फक्त उन्हाळ्यातच मंदिर कोरडे असते. महाशिवरात्रीच्या काळात पाणी ओसरून मंदिराच्या कळसाचे दर्शन शिवभक्त घेऊ शकतात. यंदाच्या महाशिवरात्रीला काही तरुण शिवभक्त कंबरभर पाण्यातून महादेवाला अभिषेक करण्यासाठी गेले होते. आणि इथूनच सुरू झाले इंस्टा आणि व्हॉट्सअपवर स्टेट्स पडणे. एखाद्याने स्टेट्स पाहिल्यानंतर त्याचे मित्र देखील मागायचे. अलीकडे सोमवारी महादेवाला स्टेट्स टाकणे एक ट्रँड बनला आहे. आणि याच ट्रेण्डमुळे हे मंदिर देखील ट्रेंड मध्ये आले आणि लोकांनी प्रत्यक्ष मंदिर पाहावे असा बेत आखला.
वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर हे तसे पाहता फारसे कुणाला माहिती नव्हते. गावात एखाद्याच्या घरी पाव्हने आले की त्यांना गाव फिरवता फिरवता सर्वात आधी हे मंदिर दाखवण्यासाठी गावकरी नेत असत. गावाशी संबंध असलेली माणसं सोडली तर हे मंदिर संपूर्ण जगापासून लपून राहिलेले होते. पण २०२१ मध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या नंतर आता मात्र मंदिरात लोकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु या आधी क्वचित एखादाच माणूस दिवसा गेला तर जाई. सर्व गावांपासून दूर धरणात असल्याने फारसे कुणाची रेलचेल नसे.
मंदिरात प्रथमच तोब्बा गर्दी आणि रांगा

अनलोकची प्रक्रिया सुरू झाल्या पासून अनेक दिवस घरात असलेले लोक आता पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. सर्व मंदिरे बंद असल्याने कायम खुल्या असलेल्या महादेवाच्या या मंदिरात भक्तगण देखील गर्दी करू लागले आहेत. जवळच्याच शिळीम गावातील गावकऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत शेकडो गाड्या येत असतात. पाचशे ते सहाशे माणसं येत असतात. या मंदिरात होणारी गर्दी इतकी वाढली आहे की आता दर्शनासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. काहीवेळेस तर पोलिसांना सुद्धा या ठिकाणी गस्त करावी लागत आहे. मंदिरात अचानकपणे होणारी पर्यटकांची गर्दी पाहता ग्रामस्थ देखील अवाक झाले आहेत. कारण अगोदर कधीही इतकी गर्दी झाली नाही. पुणे शहरातील लोक सध्या गर्दी करतच आहेत मात्र भविष्यात मुंबई सह महाराष्ट्रातुन इथे प्रचंड गर्दी उफाळू शकते.
नुकतीच झाली मंदिराची डागडुजी

२०१९ साली एका शिवभक्ताने राजस्थानहुन काही कारागीर आणून या पडझड झालेल्या मंदिराची कसलाही गाजावाजा न करता डागडुजी करून घेतली होती. खोदकाम करून माती खाली गेलेल्या पायऱ्या बाहेर केल्या. त्यामुळे हे मंदिर आता काहीसे चांगल्या स्थितीत वाटत आहे. आता पावसाळा सुरू झालं असून महिन्याभरात पुन्हा हे मंदिर पवनेच्या जलाशयात गायब होणार आहे. ते थेट २०२२ सालातच दृष्टीस येणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मात्र मोठी गर्दी इथे उसळू शकते. यासाठी स्थानिक आमदार, ग्रामपंचायत आणि राज्यसरकार या सर्व यंत्रणांना सज्ज रहावे लागणार आहे.
भविष्यात व्यवसायाला मिळणार चालना
लवकरच हे मंदिर पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित होईल. त्यामुळे दररोज पर्यटक आणि त्यातल्या त्यात शिवभक्त इथे मोठ्या संख्येने येऊ शकतात. असे झाल्यास इथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायास चालना मिळेल. फुलांचे स्टोल, प्रसादाचे स्टोल, दुग्धजन्य पदार्थांची विक्री, चहा नाश्त्यासाठीचे स्टोल, जेवणासाठी हॉटेल्स अश्या सर्व व्यवसायांना येथे भविष्यात चालना मिळणार आहे. आणि हे सर्व व्यावसाय कुणी बाहेरून येणाऱ्या लोकांनी थाटायचा आत गावकऱ्यांनीच उभारले तर जवळपासच्या गावातील तरुणांसाठी हा एक रोजगार देखील ठरणार आहे. आता या मंदिरामुळे आणखी काय काय बदल भविष्यात घडून येणार आहेत हे आपण पाहूच.
-संतोष दिवाडकर ( पत्रकार 8767948054 )