विना मास्क फिरणाऱ्या विरोधातील कारवाईत पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यावरून दोघांना गजाआड करण्यात आलय. पुन्हा वाढणाऱ्या कोरोनावर नागरिक संवेदनशील नाहीत का? असा सवाल यातून उपस्थित होतोय.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र ४ जे ची मास्क परिधान न करणाऱ्यांवर आज चक्की नाका येथे कारवाई सुरू होती. या कारवाईत स्कूटी वरून आलेल्या दोन जणांनी मास्क परिधान केला नव्हता. त्यांच्यावर पालिका कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. याउलट या दोघांनी थेट पालिका कर्मचारी राजेंद्र खैरे, राम सावंत, अमीर भालेराव, ज्ञानेश्वर ठाकरे, सुरज गायकवाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.
लग्नासाठी चाललेले हे दोघेही आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत. पोलीस प्रशासन आणि पलिका कर्मचारी यांच्याकडून वेळी वेळी समजावून देखील त्यांनी तोंडाला मास्क लावला नाहीच. उलट अरेरावी करत शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवरही सरकारी कामात अडथळा, धमकी देणे, साथीचा रोग अन्वये गुन्हा दाखल झाला असून या दोघांना उद्या कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.