क.डों.म.पा. चे मा.नगरसेवक महेश गायकवाड हे आता एका नव्या क्षेत्राकडे निघाले आहेत. त्यांच्या संकल्पनेतुन ‘डाव’ हा मराठी चित्रपट उभा राहणार आहे. आणि या चित्रपटाचा महूर्त सोहळा आज कल्याण येथे पार पडला. या सोहळ्याला सिनेमात असणारे कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक आणि संपूर्ण टीम उपस्थित राहिली होती.
‘नाथ प्रोडक्शन’ च्या माध्यमातून मराठी चित्रपट ‘डाव’ चे चित्रीकरण १३ जुलैपासून सुरू केले जाणार आहे. नावाप्रमाणेच या चित्रपटात पत्त्यांचा डाव आणि त्यातून निर्माण होणारा जुगार आणि जुगाडाचा डावपेच अशी संपुर्ण मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अनेकसे ट्विस्ट, एक्शन, ड्रामा, कॉमेडी अशी सर्व फोडणी या चित्रपटात घालण्यात आली आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ फेम राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर नायिकेची भूमिका कोण करणार ? हे मात्र गुपितच आहे. या चित्रपटात खलनायक आणि इतर महत्वाच्या भूमिका कल्याण मधील काही नवोदित कलाकार साकारणार आहेत. याशिवाय भाऊ कदम आणि आणखीन दिगग्ज कलाकार देखील चित्रपटात दिसणार असल्याचे दिग्दर्शक अमित कोळी यांनी या सोहळ्यात प्रेक्षकांशी बोलताना सांगितले आहे. या चित्रपटाच्या टायटल सॉंग ने प्रेक्षकांना चांगलेच मोहित केले. मिलिंद शिंदे यांचे चिरंजीव मधुर शिंदे यांनी हे गाणे आपल्या शिंदेशाही आवाजाच्या शैलीत गायले आहे. त्याचप्रमाणे प्रसिद्ध गायक शकील अहमद यांचेही संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. त्याचबरोबर चंद्रकला दासरी व यशश्री दासरी यांच्या आवाजातील गाणी देखील असणार आहेत. करण आणि दर्शन हे स्वतः चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन करत आहेत.
बजरंग बादशाह यांची ही कथा असून पटकथा देखील त्यांनीच केलेली आहे. चित्रपटातील संवाद संकेत हेगाणा व राकेश शिर्के यांनी लिहले आहेत. कौशल भारती छायाचित्रण तर विकी बिडकर कला दिग्दर्शक म्हणून असणार आहेत. मुहूर्त सोहळ्याला झी टॉकीज निर्माते अन्वय नायकोडी तसेच अरबाज मोघल देखील उपस्थित होते. याशिवाय निर्मिती प्रबंधक चेतन मुरूमकर, गीतकार अजय वाघमारे आणि चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक युगंधर शिंदे असनार आहेत. तर सर्वात महत्त्वाचा कॅमेरा डिपार्टमेंट श्रीनिवास शिंगे आणि राहुल बर्गे पाहणार आहेत. राधा सागर, भाग्यश्री मोटे, नितीन रूपवते, भरत ठाकूर, टिना सोनी, जॉनी रावत, विश्वजीत सोनी हे कलाकार म्हणून दिसणार आहेत.
‘नाथ’ प्रोडक्शनच्या माध्यमातून ‘डाव’ हा चित्रपट पुढे येणार असून त्यामागे अनेक लोकांचे मोठे योगदान असणार आहे. नगरसेवक महेश गायकवाड यांच्या संकल्पनेतला हा चित्रपट असून प्रसिद्ध उद्योजक संजय गायकवाड यांचे या चित्रपटाला मोलाचे सहकार्य लाभणार आहे. कल्याणचे कॉमेडी किंग आणि गायक बजरंग बादशहा तसेच वैशाली ठाकूर आणि सुजाता पवार हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. तर दिग्दर्शक अमित कोळी यांच्या नजरेतून या चित्रपटाचे दिग्दर्शन होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १३ जुलै पासून सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. त्यामुळे तमाम कल्याणकर आणि संपूर्ण महाराष्ट्र लवकरच हा नवा ‘डाव’ पाहण्यासाठी नक्कीच आतुर असतील.
महूर्त सोहळ्याचे काही क्षण :-
-संतोष दिवाडकर