आंबिवली: मोहने आंबिवली शहरातील रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडे दर सर्वेक्षण विनाविलबं करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष प्रणव पेणकर आणि मोहने आबिवंली विभागीय अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका, आरटीओ, वाहतुक पोलिस पोलिस प्रशासन यांचे मोहने आंबिवली विभागातील वाहतुक व्यवस्था याबाबत दुर्लक्ष होत आहे. मोहने आंबिवली हा परीसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आहे. मोहने आंबिवली शहराचे झपाट्याने शहरीकरण व नागरीकरण झालेले आहे. त्याच प्रमाणात लोकसंख्या व वाहनांची संख्या वाढली आहे. हा परिसर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असुनही मोहने आंबिवली शहरातील वाहतूक व्यवस्था बाबतीत अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे. ही बाब खेदजनक आहे.
आंबिवली मोहने शहरात वाहतुक व्यवस्था नियोजन या करिता आजगायत वाहतुक नियमन व उपाययोजना केल्या नाहीत. कल्याण डोंबिवली शहरात रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा भाडे दर निश्चिती सर्वेक्षण करण्यात आले पंरतु मोहने आंबिवली शहरातील प्रवासी व रिक्षा आवश्यकता व प्रवाशी व रिक्षांची अमाप संख्या जास्त असुनही रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा सर्वेक्षण शहराअतंर्गत केले नाही ही बाब आश्चर्यजनक आहे. त्यामुळे या सर्वेक्षणा बाबत खुलासा व अवगत करुन विनाविलंब शहराअतंर्गत रिक्षा स्टॅण्ड व शेअर रिक्षा रुट भाडेदर निश्चित सर्वेक्षण करण्याची मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.
-कुणाल म्हात्रे