मोहने :- भागीदार असणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅट बुकिंग करणाऱ्या किमान ३८ लोकांचे तीन कोटी रुपये घेतल्याची बाब समोर आली आहे. पैसे घेऊन घरांचा ताबा अद्यापही दिला नसल्याने ग्राउंड प्लस सात मजली इमारत कामाविना जैसे थे अवस्थेत असल्याने या विरोधात बुकिंग करणाऱ्यांनी पोलिस तसेच रेराकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला कोरोनाची झळ लागल्याचे दिसून येत आहे. मात्र इमारत बांधण्या अगोदर फ्लॅट बुंकिंग पैसे घेणे किती अंगलट येणार हे आता शासकीय यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांच्या कारवाईवर अवलंबून आहे.
मोहने येथील शांताराम पाटील नगर येथे बांधकाम व्यावसायिक असलेले आनंद दुबे, भरत मलिक व विजय उपाध्याय या तिघांनी बालाजी डेव्हलपर्सच्या नावाने गार्डन इस्टेट संकुलनाचे २०१६ रोजी बांधकाम सुरू केले होते. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नगररचना विभागाने या कामाला मंजुरी दिल्याने परिसरात असणाऱ्या नागरिकांनी लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या सदनिकेचा नोंदणीकृत खरेदी करारनामा केला होता. एकूण ५६ फ्लॅट अस्तित्वात असून ३८ नागरिकांनी बुकिंग करतावेळेस लाखो रुपये बांधकाम व्यावसायिकाला त्यावेळेस देण्यात आले होते. बुकींग करता वेळेस इच्छुकांनी खासगी तसेच पतपेढी व विविध वित्तीय बँकांकडून कर्ज काढुन विकासकांना दर महिन्याला लोनचा हप्ता देण्यात येत होता. ३८ नागरिकांचे लोनचे हप्ते पूर्ण फिटूनही अद्यापही त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आलेला नाही.
बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट धारकांना २०१९ ते २०२० पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगण्यात आले होते. २०२१ हे वर्षही उलटून चालले असताना बांधकाम व्यावसायिक बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रेराकडून देखील २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सदनिकेचा ताबा देण्याबाबतची शेवटची तारीख देण्यात आली होती.
सदर इमारतीतील घरे विकासकाने बुकिंग रक्कम घेऊन नोंदणीकृत करारनामा केला असतानाही काम अपूर्ण ठेवले असून कामाकडे विकासक संपूर्ण दुर्लक्ष करीत असून सदनिकाधारकांना कोणताही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप बुकींग धारकांनी केला आहे. विकासकांच्या अशा वर्तनामुळे सदनिकाधारकांच्या कर्जाचे हप्ते व घरांचे भाडे यामुळे सदनिकाधारकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
सदनिकाधारकांचे फोन न उचलणे आणि उचलल्यास शिव्या व धमकी देणे आदी प्रकार होत असल्याने याबाबत सदनिकाधारकांनी खडकपाडा पोलीस स्टेशन तसेच रेराकडे याबाबत तक्रार केली आहे. विकासकांनी मोठ्या प्रमाणात आमची किमान तीन कोटी रुपयांची आर्थिक लूट करून अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप ३८ सदनिका बुकिंग केलेल्या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या अनागोंदी कारभाराची चौकशी होऊन पीडितांना दिलासा देणारी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.
यासंदर्भात विकासक भरत मलिक यांच्याशी संपर्क साधला असता कोविडमध्ये काम बंद होते. मात्र आता ते सुरू करण्यात आले असून इमारतीचे फिनिशिंगचे काम सुरू करणार असून लवकरच त्यांना सदनिकेचा ताबा देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले.
-रोशन उबाळे